Crime News : प्रेमाच्या सुरुवातीला एकमेकांसाठी जीव देऊ म्हणणारी प्रेमी युगुले नात्यात कटूता आल्यावर एकमेकांच्या आयुष्यावर उठल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतीलच. आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. पण काही विकृत स्वतःसोबत आपल्या प्रियकराचेही आयुष्य उद्धवस्त करत हे प्रेम मिळवण्याचे प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातल्या जळगावात (jalgaon) पाहायला मिळाला. जळगावात एका प्रियकराने प्रेयसीच्या साखरपुड्यात (engagement) जाऊन गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रियकर विवाहीत असूनही त्याने प्रेयसीची पाठ सोडली नव्हती.
विवाहित प्रियकराने सुरुवातीला 22 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत सेल्फी देखील काढला होता. मात्र हाच सेल्फी या तरुणीला आता महागात पडला. तरुणीचा साखरपुडा होत असल्याचे कळताच प्रियकराने तिथे जाऊन गोंधळ घातला आणि फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. यानंतर विवाहित प्रियकराविरुद्ध जळगावातील पारोळा पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव येथील पारोळा तालुक्यातील एका गावात ही तरुणी राहत आहे. या तरुणीच्या गावापासून जवळच राहत असलेल्या प्रियकराने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध निर्माण केले होते. माझ्या पत्नीला सोडून मी तुझ्यासोबत लग्न करेन, असं आश्वासन तरुणीला प्रियकराने दिले होते. तरुणीचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातल सेल्फीदेखील काढला.
मात्र तरुणीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह दुसऱ्याच मुलासोबत ठरवला होता. 9 डिसेंबर रोजी तरुणीचा साखरपुडा होणार होता. याची माहिती विवाहित प्रियकराला मिळाली. त्याने थेट साखरपुड्याच्या ठिकाणी जाऊन राडा घालण्यास सुरुवात केली. नातेवाईकंना शिवीगाळ करत तरुणीसोबतचा मंगळसूत्र घातलेला फोटो व्हायरल करेल, तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकीही दिली.
साखरपुड्यामध्ये गोंधळ घातल्यानंतरही प्रियकराने तरुणीची पाठ सोडली नाही. दुसऱ्या दिवशी तरुणीच्या घरी पोहोचत तिचा हात ओढत तिला जवळ ओढले. यावेळी तरुणीचे नातेवाईक तिथे आले आणि त्यांनी तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण प्रियकराने त्यांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या सर्व प्रकारानंतर तरुणीने विवाहित तरुणाविरुद्ध पारोळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर या तरुणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.