ठाणे / कल्याण : ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून उपहारगृहे बेमुदत बंद ठेवली जाणार आहेत. (Restaurants in Thane) एकीकडे अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्याने व्यापाऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे ठाण्यात निर्बंध शिथिल करताना जिल्हा प्रशासनाने उपहारगृहांना वेळ वाढवून न दिल्याने उपहारगृह मालक नाराज आहेत. यामुळे संतापलेल्या उपहारगृह व्यावसायिकांच्या संघटनेने येत्या सोमवारपासून पूर्ण जिल्ह्यात घरपोच सुविधेसह उपहारगृहे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने कोवीडचे निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापारी आणि दुकानदारांनी आनंद व्यक्त केला असतानाच दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनीही हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कल्याणातील प्रत्येक हॉटेल बाहेर आम्हाला न्याय द्या ,निर्बंध शिथिल करा अशा मागणीचे फलक लावण्यात आले होते तसेच गेल्या दीड वर्षांपासून आम्हीही सर्व जण आर्थिक संकटात सापडलो आहोत. गेल्या दिड वर्षांत हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने निर्बंध घालताना किंवा शिथिल करताना आमच्या संघटनाना विचारात घेणे गरजेचे होते त्यामुळे दुकानदारांप्रमाणे सरकारने आमचाही विचार करावा. अन्यथा आम्ही देखील हॉटेल बंद ठेवू असा इशारा दिला आहे.