मुंबई : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायतीचे निकाल लागलेत. प्रथमच स्वतंत्रपणे निवडणूक लढणाऱ्या ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना किती जागा मिळतात याचीच उत्सुकता होती. त्यांच्या समर्थ विकास पॅनेलचे सर्वाधिक सरपंच निवडून आलेत. राणेंकडे १५६, शिवसेनेकडे ८४ तर ५१ भाजपकडे ग्राम पंचायती आल्याचा दावा करण्यात आलाय.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ कास पॅनेल एक नंबर ठरलाय. ग्रामीण भागात शिवसेना आणि भाजपने मुसंडी मारली आहे. १५६ पेक्षा अधिक ग्राम पंचायतीवर समर्थ विकास पॅनेलने दावा केला असून ८४ ग्राम पंचायतीवर शिवसेना तर ५१ ग्राम पंचायतीवर भाजपने वर्चस्व निर्माण केल्याचा दावा केला आहे. जवळपास ३१ ग्राम पंचायतीमध्ये गाव पॅनेलची सत्ता आली असून तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार सरपंचपदी निवडून आले आहेत.
समर्थ विकास पॅनेलच्यावतीने आमदार नितेश राणे यांनी सर्वाधिक सरपंच मिळाल्याचा दावा केलाय. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी, भाजपचे नेते जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी विविध ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी पक्षाने सावंतवाडी तालुक्यातील कास ग्राम पंचायतीवर दावा केला. मनसेने निगुडे ग्राम पंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे.
या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांनाही पराभव पत्करावा लागला असून काँग्रेसच्या हाती भोपळा आला. निगुडे येथे मनसेचा उमेदवार निवडून आला. मात्र त्याच्यावर भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. माजगावची प्रतिष्ठेची जागा शिवसेनेने अवघ्या चार मतांनी जिंकली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. जिल्ह्यातील ३२५ ग्राम पंचायतीपैकी ११७ ठिकाणी शिवसेनेचे सरपंच विराजमान झाल्याचा दावा जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सेनेला चांगले यश मिळाले आहे. जिल्ह्यातील जनतेने विकासासाठी सेनेला साथ दिली आहे असेही आमदार नाईक म्हणाले.
कणकवली तालुक्यात ४६ सरपंच समर्थ पॅनेलचे विजयी झाले आहेत. शिवसेनेला २, भाजपला ४ तर ग्रामविकास पॅनेलचे ४ ठिकाणी सरपंच बसले आहेत. दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात आठ ग्राम पंचायतीवर समर्थ विकास पॅनेल, ७ ग्राम पंचायतीवर शिवसेना, ५ ग्राम पंचायतीवर भाजप तर ३ ग्राम पंचायतीवर गाव विकास पॅनेल विजयी झाले आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये १४ ग्राम पंचायतीवर समर्थ विकास पॅनेलची सत्ता आली असून २ ग्राम पंचायतीवर भाजप तर एका ग्रा.पं.वर ग्रामविकास पॅनेलची सत्ता आहे. सावंतवाडी तालुक्यातील २५ ग्राम पंचायतीवर समर्थ पॅनेल, ८ ग्राम पंचायतीवर शिवसेना, १७ ग्राम पंचायतीवर भाजप, एका ग्राम पंचायतीवर ग्रामविकास पॅनेल व एका ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने सावंतवाडी तालुक्यातील पंचवीसहून अधिक ग्राम पंचायतीवर सत्ता मिळविली. तर भाजपाने दुसरा क्रमांक पटकावत जोरदार मुसंडी मारत १७ ग्राम पंचायतीवर यश प्राप्त केले. पालकमंत्री दीपक केसरकर यांचे होमपिच असूनही शिवसेना १२ जागांसह तिसर्या क्रमांकावर फेकली गेली. तर राष्ट्रवादीने कास ग्रामपंचायतीवर विजय मिळवत खाते खोलले.
माजगावची प्रतिष्ठेची जागा शिवसेनेने अवघ्या चार मतांनी जिंकली. सावंतवाडी तालुक्यातील ग्राम पंचायतीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात बांदा ग्राम पंचायतीमध्ये सदस्य काँग्रेसचे विजयी झाले असले तरी त्या ठिकाणी सरपंच मात्र भाजपाचा विजयी झाला. दुसरीकडे स्वाभिमानचे संजू परब यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माजगाव ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनचे दिनेश सावंत हे प्रतिस्पर्धी उमेदवारावर चार मतांनी विजयी झाले. दुसरीकडे मडुर्यात मात्र समर्थ पॅनलचा सरपंच अवघ्या दहा मतांनी निवडून आला.