Gold Prices: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. तसेच याचा परिणाम जगभरात पाहायला मिळतोय. यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबावे यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न सुरु आहे. इस्रायल युद्धाचा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळतंय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे भारतात दसरा, दिवाळी तोंडावर आली असताना सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ दिसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान किती आहेत सोन्या-चांदीचे दर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सर्वजण सोने-चांदीची खरेदी करतात. पण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ सर्वांसाठीच चिंताजनक ठरू शकते. दररोज सोन्याच्या किमती नवा उच्चांक गाठत आहेत.सणासुदीतच सोन्याचा बाजारात तेजी पाहायला मिळतेय. सोन्याचा भाव नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याची किंमत महाग झाली आहे. आज 10 ग्रॅमची किंमत काय आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 60,600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. आज चांदीचा भाव 0.26 टक्क्यांच्या वाढीसह 71,800 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे. त्यामुळे सणासुदीत सोने-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्यांना खिसा थोडा जास्त मोकळा करावा लागणार आहे.
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजार 850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये त्याची किंमत 55 हजार 850 रुपये आणि अहमदाबादमध्ये 55 हजार 750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजार 700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
रशिया-युक्रेननंतर इस्रायल-हमास युद्धामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. त्यात इस्रायल-हमास युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत बरीच अस्थिरता आहे. या अस्थिर बाजारात, गुंतवणूकदार जोखीम घेणे टाळतात, ज्यामुळे लोक त्यांचे पैसे सोन्यात गुंतवणे चांगले मानतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव नवा विक्रमी उच्चांक गाठू शकतो, असे मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगितले जात आहे.
6 मे रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याने 61 हजार 845 रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला होता. तर आज एमसीएक्सवर सोन्याची किंमत 60 हजार 600 च्या जवळ आहे. त्यामुळे सोन्याची किंमत लवकरच बाजारात नवा विक्रम रचू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.