सत्ता गेल्यानंतरही भाजपमध्ये 'इनकमिंग सुरु'; महाडिक बंधुंचा पक्षप्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या काळात तर भाजपने मेगाभरती राबवली होती.

Updated: Dec 23, 2019, 10:52 PM IST
सत्ता गेल्यानंतरही भाजपमध्ये 'इनकमिंग सुरु'; महाडिक बंधुंचा पक्षप्रवेश title=

कोल्हापूर: माजी खासदार धनंजय महाडिक यांचे बंधु सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाडिक बंधुंनी भाजपमध्ये प्रवेश केला. इस्लामपूरमध्ये महाडिक यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे महाडिक बंधूंच्या भाजप प्रवेशाने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे राजकारण बदलण्याची शक्यता आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काळात भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात इनकमिंग झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात तर भाजपने मेगाभरती राबवली होती. या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. यापैकी काहीजणांना विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र, बहुतांश जणांना पराभवाचा सामना करावा लागला. 

यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये गेलेले अनेक नेते घरवापसीसाठी उत्सुक असल्याचेही म्हटले होते. मात्र, याच नेत्यांच्या जाण्याने अनेक ठिकाणी नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार झाली आहे. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्हाला निवडणुकीत यश मिळाले होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले होते.