NRI यवतमाळकराचं अमेरिकन मित्राशी लग्न

सध्या चर्चेत आलंय ते एका समलिंगी विवाहसोहळ्यामुळे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 12, 2018, 09:04 PM IST
NRI यवतमाळकराचं अमेरिकन मित्राशी लग्न  title=

यवतमाळ : सध्या चर्चेत आलंय ते एका समलिंगी विवाहसोहळ्यामुळे. 

शहरातला पहिला समलिंगी विवाह सोहळा यवतमाळच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका अलिशान हॉटेलमध्ये पार पडला. मूळचा यवतमाळकर असणारा पण सध्या अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या ऋषिकेश साठवणे या तरुणाचं अमेरिकतल्याच एका मित्रावर प्रेम जडलं होतं.

हा मित्र मूळचा चीनचा. त्याचं नाव व्हीन. तो देखील याच्याप्रमाणंच अमेरिकेत स्थायिक झालेला. त्याला भारतातल्या अनेक मुलींची स्थळं येत होती. मात्र तो या स्थळांकडं दुर्लक्ष करायचा. आपल्या मित्राशीच लग्न करण्याचा त्याचा हट्ट होता. त्याच्या आईचा अखेरपर्यंत या लग्नाला विरोध होता. जाहीरपणे यवतमाळमध्ये असं लग्न लावून दिलं तर लोकांमध्ये आपलं हसं होईल, अशी भीतीही त्याच्या कुटुंबियांना वाटत होती.

मात्र या भीतीवर मात करत मोजके पाहुणे आणि मित्रमंडळींसह 30 डिसेंबरला हा विवाह सोहळा पार पडला. हॉटेलमध्ये फक्त गेट टुगेदर होतं असं साठवणे कुटुंबियांचं म्हणणं आहे. तर या गेट टुगेदरमध्ये नेमकं काय झालं, याची कल्पना नसल्याचं हॉटेलचे मालक सांगतायत. भारतीय दंडविधानाच्या कलम 377 नुसार समलिंगी संबंधांना गुन्ह्यांच्या कक्षेतून वगळण्याचे प्रयत्न सध्या अंतिम टप्प्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवरही या लग्नाकडं पाहिलं जातंय.