Ferry Ki Sawari Vasai : समुद्रावर स्वार असलेल्या बोटी आणि बोटीत पार्टी... डोळ्यासमोर येते ते गोव्यात बोटींवर होणारी क्रूज पार्टी. आता आपल्या महाराष्ट्रात गोव्याचा फिल घेता येणार आहे. वसईच्या समुद्र किनाऱ्यावर फेरी की सवारी नावाने क्रूज सेवा सुरु करण्यात आली आहे. या क्रूजवर गोवच्या क्रूज पार्टीसारखा अनुभव घेता येणार आहे.
गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा अर्थात लक्झरी क्रुझचा आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवेअंतर्गत मेजवानी बोट सफर सुरू करण्यात आली आहे. ही बोट सेवा फेरी की सवारी नावाने ओळखली जातेय.
वसई हे मुंबई ठाण्याच्या अगदी जवळचे ठिकाण आहे. लोकल ट्रेनने तासाभरात वसईला पोहचता येते. वसई परिसरात फिरताना गोव्याचा फिल येतो. वसई हे मिनी गोवा म्हणूनही ओळखले जाते. वसई किल्ला तसेच राजौडी बीच हे वसईचे प्रमुख आकर्षण आहे. तुंगारेश्वर जंगल तसेच वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड देखील लोपकप्रिय पर्यटन स्थळ आहेत. यामुळे वसईत नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते.
वसईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांना आता क्रूज पार्टीचा देखील आनंद लुटता येणार आहे. येथे सनसेट, चाँद की सवारी अशा वेगवेळ्या वेळेत वेगवेगळा अनुभव पर्यटकांना घेता येत आहे. या बोटीवरुन पर्यटकांना अविस्मरणीय असा सूर्यास्त अनुभवता येणार आहे. तर, चाँद की सवारीमध्ये पर्यटकांना रात्रीच्या वेळेस क्रूज वर नाईट लाईफचा अनुभव घेता येणार आहे. या फेरी की सवारीलावर क्रूज पार्टीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.