Ex Corporator Mangesh Satamkar: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मंगेश सातमकर यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती आदी विविध समित्यांमध्ये काम केले आहे. ते शिक्षण समितीचे अध्यक्षदेखील राहिले होते. या ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जातो. दरम्यान सातमकरांचा पक्षप्रवेश सुरु असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली. त्यांच्याभोवती फिरणाऱ्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटात प्रवेश करण्याआधीच ते आरोपमुक्त झाले आहेत. या दोन्ही घटना समान कालावधीत घडल्या असल्याने हा योगायोग म्हणायचा का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
शिवसेना माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर एका 29 वर्षीय तरुणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ही तरुणी सातमकर यांच्यासोबत काम करायची. दरम्यान सातमकर यांनी आपल्याला लग्नाचे आमिष दाखवले आणि लैंगिक अत्याचार केला असे पीडित तरुणीचे म्हणणे होते. अँटॉप हिल येथे आपल्यासोबत गैरप्रकार घडल्याचे तरुणीने आरोपपत्रात म्हटले होते. वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मंगेश सातमकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सातमकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या तरुणीने आता प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आम्ही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने आमच्या दोघांमध्ये वाद झाले होते. त्यातून काही गैरवर्तणूकदेखील झाली, असे तिने म्हटले आहे. दरम्यान आता आम्ही दोघांनाही हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचे ठरवण्यात आले असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
आपण मंगेश सातमकर यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेत आहोत. हे करत असताना आपल्यावर कोणाचाही दबाव नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसात शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात येणाऱ्यांची रिघ लागली आहे. काही दिवसांपुर्वीच विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याआधी शिशिर शिंदे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला होता. यासोबतच मुंबई महापालिकेतील नेत्या तृष्णा विश्वासराव, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून ठाकरे गट्टाला मोठे धक्के देण्याचे सत्र सुरुच असल्याचे दिसत आहे.