Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. तसंच, पोलिसांवरही विरोधकांनी आरोप केले आहेत. अक्षय शिंदे याच्या वडिलांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. अक्षय शिंदे याच्या अत्यंसंस्कारावरुनही मोठा वाद उफाळून आला आहे. शिंदेच्या वडिलांनी बदलापूर पूर्व पोलिसांकडे अर्ज केला आहे. दफनविधीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली आहे.
अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राज्यात नवा वाद समोर येत आहे. अक्षय शिंदे याचे अंत्यसंस्कार मांजर्ली स्मशानभूमी होऊ देणार नाही असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. त्यातच आता अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी मृतदेहाचे दफन करणार असल्याचं म्हटलं आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शिंदेच्या दफनविधीसाठीही जमीन उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.
अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाने अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्या यासाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी स्थानिक उपायुक्तांच्या मार्फत स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने जमीन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं होतं. मात्र अजूनही, जमीन न मिळाल्याने मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा अक्षयच्या वडिलांनी आरोप केला आहे.
दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसंच, त्याच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळं पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरणार आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार आहे. ज्यामुळे भविष्यात भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल, असं अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी झाली. अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. तसंच, आपल्या जिवालाही धोका असल्याचं त्यांनी हायकोर्टाला सांगितलं. यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. अक्षयच्या वकिलांनी एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा.तसेच सिसीटीव्ही फुटेज जाहीर करा, अशी मागणी केली आहे.