विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यातील गंगापूरमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. गंगापूर (Gangapur) तालुक्यात शेजारीच राहणाऱ्यांनी एका महिलेवर अत्याचार (physical abuse) करत तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित महिलेलाही याबाबत कुठे वाच्च्यता केलीस तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. तब्बल पाच दिवसांनी महिलेने तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या शेजारी राहणाऱ्यांनीच हा धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी रायभान थोरात, राहुल आघाडी, अनिल शिरसाट या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींनी 1 एप्रिलच्याा रात्री दीडच्या सुमारास महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी पीडितेच्या पतीला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या नंतर जखमी पतीला आरोपींनी थेट 45 फूट खोल विहिरीत टाकले. अर्ध्या तासानंतर त्याला पुन्हा वर काढून जीव जाईपर्यंत आरोपींनी मारहाण केली.
यादरम्यान, आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. आरोपींनी या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेला धमकी देत कोणालाही याबद्दल न सांगण्यास सांगितले. मात्र पोलिसांच्या चौकशीत महिलेने घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणात गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
"1 एप्रिलच्या रात्री पीडित महिलेने तिच्या पतीला मारहाण झाल्याची तक्रार दिली होती. घराच्या शेजारी शेताजवळ पतीला मारहाण झाल्याचे महिलेने सांगितले होते. रायभान थोरात, राहुल आघाडी, अनिल शिरसाट या तिघांनी ही मारहाण केली होती. रात्री एकच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला होता. मारहाणीनंतर आरोपींनी 45 फूट खोल विहीरीत पतीला ढकलून दिले. पीडितेचा पती विहीरीत पडल्यानंतर आरोपी रायभान थोरात याने दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरत पतीला वर आणले. अर्धा तास पुन्हा पीडितेच्या पतीला आरोपीने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तक्रार न करण्यास पीडितेला सांगितले होते. त्यामुळे महिलेने कुटुंबियांना पती विहिरीतून खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तक्रार देण्यासाठी पीडित महिला तिच्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात आली होती. मात्र कसून चौकशी केल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार तीन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे," अशी माहिती गंगापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक साईनाथ गीते यांनी दिली.