Chhatrapati Sambhaji Maharaj : 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षक वर्गानं या चित्रपटाला प्रशंसनीय प्रतिसाद दिलेला असतानाच विकीपिडीयामुळं मात्र एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विकिपिडियाचा माहितीचा स्त्रोत म्हणून वापर केला जातो. विकिपिडियावरील खोडसाळ माहितीमुळं जाणिवपूर्वक शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जातोय. शंभूराजांबाबतही खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी यासाठी झी 24 तासनं मोहीम हाती घेतली आहे.
शंभूराजांबाबतचा तो खोडसाळा मजकूर हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तो मजकूर न हटवल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतेय. आश्चर्याची बाब म्हणजे विकिपीडिया ने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये अधिकच संताप होत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आणि विविध कलाकृतींतून छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अनेकदा साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांनी या संपूर्ण प्रकरणी नाराजीची प्रतिक्रिया देत सातत्यानं या गोष्टी घडत असल्याचं म्हटलं. 'या न त्या मार्गानं वारंवार चारित्र्य हननाचा प्रयत्न होत असून हे सगळं संदर्भ देत होत असल्यामुळं हे सारंकाही अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पुसण्यामध्ये, वर्षानुवर्षे बरंच काही लिहिलं गेलं, चुकीचे मजकूर जोडले गेले आणि त्याचच प्रतिबिंब म्हणजे आता ही विकिपिडियावर दिसणारी माहिती आहे असं म्हणज हे करण्यामागे एक मोठं षडयंत्र आहे' असं ते म्हणाले. सर्व मुद्दे, आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यानंतर बलिदान अधोरेखित करणं हे चालूच आहे आणि तेच पुन्हा अत्यंत दुर्दैवीपणे पाहायला मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारनं लवकरात लवकर यासंदर्भातील सूचना जारी करत जनमानसाच्या भावनांचा आदर करावा अशीही मागणी केली.