Chhagan Bhujbal On Denial Of Tickets: अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी उत्सुक होते. मात्र पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्या बिनविरोध खासदार झाल्या. मात्र यानंतरही भुजबळांच्या नाराजीबद्दल चर्चा सुरु आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील घराणेशाहीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनाही निशाणा साधल्याचं पाहायला मिलालं आहे. तर भुजबळ यांना डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या सर्वच प्रश्नांना भुजबळ यांनी स्वत: पत्रकारांशी बोलताना उत्तरं दिली आहेत.
नाशिकमध्ये भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. "तुम्ही नाराज आहात अशी चर्चा आहे," असं म्हणत भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना भुजबळांनी, "नाराज असल्याची चर्चा तुम्हीच करता," असं म्हटलं. "तुम्ही इच्छा व्यक्त केलेली खासदार व्हायचं आहे," असं म्हणत भुजबळांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी, "ईच्छा आहे. म्हणून तर मी नाशिकची लोकसभा लढवायला तयार झालो होतो," असं उत्तर दिलं. "दिल्लीतून तिकीट फायनल झाल्याचं सांगितल्याने कामाला लागलो. त्यानंतर एक महिना त्याचा निकाल जाहीर व्हायला लागला. तेव्हा मी म्हटलं हे फार इरीटेशन होतं. मी थांबून घेतलं. इतर उमेदवार एका महिन्यापासून कामाला लागलेत. कोणाला द्यायचं त्याला उमेदवारी द्या. त्यानंतर 12 ते 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली. फॉर्म मिळायच्या एक दिवस आधी उमेदवारी जाहबीर झाली. याचे परिणाम जय-पराजयावर होत असतात," असं सूचक विधान भुजबळांनी केलं.
तुम्हाला पक्षातून डावललं जातंय असं काही आहे का? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भुजबळ यांनी, "पक्षात तुमच्या मनासारख्या गोष्टी होतं नाही. कधीतरी थांबावं लागतं. 57 वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणामध्ये. शिवसेनेचं आयुष्य झालं तेवढं माझं झालं. अनेकदा असं झालं की आपल्याला वाटतं असं व्हावं पण ते झालं नाही. कदाचित त्यामागे काही घटक असतील किंवा काही बंधनं असतील पक्षाची," असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर
"लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही वेळेस तुमच्यावरच का अन्याय?" असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भुजबळ यांनी, "ते त्यांना आता विचारा. मला काही माहिती नाही," असं मोजक्या शब्दात उत्तर दिलं.
सुनेत्रा पवारांचं नाव राज्यसभेच्या खासदार म्हणून निश्चित झाल्याचा संदर्भ देत घराणेशाही वाटत नाही का? सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय मिळेल असं वाटतं? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि 'पुढे... नेक्स्ट' असं म्हणत पुढला प्रश्न घेतला.