बीड : दसरा मेळव्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यामध्ये हार घालणार नाही आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही ही शपथ घेतली आहे असा निर्धार पंकजा मुंडे यांनी केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचितांच्या दारापर्यंत जाऊन झुकून नमस्कार करुन त्यांच्या विकासासाठी झटण्याची शपथ या मेळाव्याच्या माधम्यातून शपथ मी खाते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल यावर आज उठवणार आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचं कारस्थान सुरु आहे. मराठा समाज शिक्षणाचं आरक्षण मागतो, ओबीसी समाज राजकीय आरक्षण मागतो, दोघांची भांडणं नाहीत, दोघं मिळूनच बहुजन समाज आहे. आणि या बहुजन समाजाची वज्रमुठ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी जो दौरा करणार आहे, त्या दौऱ्यात मराठा समाज, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि मजूर, महिलांची सुरक्षा हे घेऊन मी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं