Santosh Deshmukh Murder: हत्या, व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 12, 2025, 09:25 PM IST
 Santosh Deshmukh Murder: हत्या, व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप title=
संतोष देशमुख हत्याप्रकरण

Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हीडिओ कॉल करण्यात आला होता. एकदा नव्हे तर दोन वेळा व्हीडिओ कॉल करण्यात आल्याचं उघड झालंय. व्हीडिओ कॉलवरून देशमुखांची क्रूर हत्या कुणी बघितली, हा तपासामधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. 

सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता. देशमुखांच्या अमानवीय खूनानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला होता. टोळक्यानं संतोष देशमुखांना घेरलं. काठी, गॅस पाईप, फायटर आणि इतर धारदार शस्त्रानं देशमुखांवर वार करण्यात आले. अत्यंत अमानुषपणे देशमुखांना मारहाण केली जात होती आणि हा सगळा प्रकार व्हीडिओ कॉलवरून दाखवला जात होता, अशी धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आली आहे. मात्र व्हीडिओ कॉल कुण्या एका व्यक्तीला केला नसून एका व्हॉट्सअप ग्रूपलाच व्हीडिओ केल्याची धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हीडिओ कॉल केल्याचं उघड झालंय.'मोक्कार पंती' नावाच्या व्हॉट्सअप ग्रूपवर व्हीडिओ कॉल करण्यात आला होता. आरोपी सुदर्शन घुले आणि जयराम चाटेनं व्हीडिओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रूपमधील 17 ते 19 वर्ष वयोगटातील 6 जणांनी मारहाणीचा व्हीडिओ पाहिल्याचं समोर आलंय. मारहाण होत असताना दोनवेळा कॉल केल्याचं उघड झालंय.
मारहाण करताना आणि त्याच्या आधी सुद्धा या ग्रुप वर व्हीडिओ  कॉल केल्याचं तपासात उघड झालाय, हा कॉल  तब्बल 6 जणांनी पहिला होता आता त्यांनाही ओळखून  त्यांची चौकशी  करण्यात येणार आहे.

व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांकडून फायटर, गॅस पाईप, आणि काठीनं संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा गुन्हा करत असताना आरोपीच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसून येत नव्हता...आरोपी हे कृत्य करताना पाशवी आनंद घेत होते असंही तपासात याआधी उघड झालंय. त्यात आता फक्त आरोपी नाही तर व्हीडिओ ग्रूपवरही अनेक जण हा प्रकार पाहत होते...म्हणजे गुन्ह्यात इतरही काही लोकांचा सहभाग आहे का, या दृष्टीनंही आता तपास सुरू आहे.

आधी संतोष देशमुखांची क्रूर हत्या आणि त्यानंतर त्या हत्येचा विकृत आनंद आरोपी घेत होते. व्हीडिओ कॉलवरून देशमुखांची हत्या कुणी बघितली हादेखील तपासामधला अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मारेक-यासंह ज्यांनी व्हीडिओ कॉलवरून ही क्रूर हत्या बघितली त्यांनाही याप्रकरणात सहआरोपी केलं जाणार का, हेही पाहणं महत्त्वाचंय.