परळीत आणखी एका सरपंचाचा मृत्यू; राखेच्या डंपरने उडवलं, अपघात की घातपात?

बीड जिल्हा सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानं बदनाम झालाय. परळीतल्या गुंडगिरीमुळे परळीकर हैराण आहेत. त्यात परळीत अजून एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्यानं पुन्हा खळबळ माजलीय. नेमकी कुठं घडली ही घटना आणि काय आहे यामागचं सत्य, जाणून घेऊयात.

वनिता कांबळे | Updated: Jan 12, 2025, 09:16 PM IST
 परळीत आणखी एका सरपंचाचा मृत्यू; राखेच्या डंपरने उडवलं, अपघात की घातपात? title=

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या परळीतील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना होतो न होतो तोच अजून एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर दुचाकीवरुन जात असताना त्यांना राख वाहून नेणाऱ्या डंपरनं जोरदार धडक दिली. या अपघातात सरपंच अभिमन्यू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर डंपरचालक तिथून फरार झाला आहे. ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करुन डंपर चालकाला तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी केलीय. त्यामुळं हा अपघात नक्की अपघातच होता की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणातनंतर बीड आणि परळी तिथल्या अवैध राख, वीटभट्टी उद्योगांमुळे आणि त्यामुळं तिथं सुरु असलेल्या गुंडगिरी आणि दडपशाहीमुळे बदनाम झालंय. त्यात मिरवट फाट्यावर दुसऱ्या संरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्यानं संशयाचं वावटळ उठलंय. मात्र गावकऱ्यांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. 

या अपघातानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील अवैध राखेच्या वाहतुकीवर बोट ठेवत प्रशासनाला जबाबदार धरलंय.तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अपघात प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय.  संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड, त्याची खंडणीखोरी, परळीतलं राखेचं आणि वीटभट्टीचं राजकारण हे मुद्दे सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचे मुद्दे ठरलेत. परळीत बेदरकरापणे राखेच्या वाहनांची सुरु असलेली वाहतूक लोकांच्या जीवासाठी आणि आरोग्यासाठीही घातक ठरतेय. आणि त्याच राखेच्या बेदरकार वाहतुकीनं आज आणखी एका सरपंचाचा बळी घेतलाय. आता पोलीस तपासात नेमका काय उलगडा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल.