Arushi Nishank : लोकप्रिय अभिनेत्री आणि चित्रपट निर्माता आरुषी निशंकनं मुंबईच्या दोन निर्मात्यांवर चार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषीनं निर्माता दाम्पत्य मानसी आणि वरुण बागल यांच्या विरोधात फसवणूक आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरुषीनं आरोप केला आहे की दोन्ही निर्मात्यांनी अभिनेता विक्रांत मैसी आणि शनाया कपूर यांच्या 'आंखों की गुस्ताखियां' या चित्रपटामध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर धोका दिला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की निर्माते तिच्या घरी आले आणि त्यांना 'आंखों की गुस्ताखियां' मध्ये महत्त्वाची भूमिका देणार असल्याचे सांगितले.
या निर्मात्यांनी कथितपणे आरुषीला पाच कोटींची गुंतवणूक करण्यासाठी तयार केलं. त्याशिवाय चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्याचं वचन दिलं. इतकंच नाही तर चित्रपटाला जितका फायदा होईल त्याचे 20 टक्के प्रॉफिट देण्याचं वचन दिलं. तर त्यांनी जो अंदाज लावला होता 15 कोटींचा त्याहून हे 20 टक्के जास्तच होते. त्यांनी आरुषीला आश्वासन दिलं की जर ती भूमिका आवडली नाही तर तिला तिनं केलेली गुंतवणूक ही 15 टक्के व्याजासोबत परत देण्यात येईल.
त्यानंतर 9 ऑक्टोबर 2024 ला एका गोष्टीवरून एमओयूवर साईन केली. दुसऱ्या दिवशी, निर्मात्यांनी अभिनेत्रीकडून 2 कोटी रुपये घेतले. पुढच्या काही आठवड्यात त्यांनी कथितपणे जास्त पैसे देण्यासाठी दबाव टाकला. 27 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर आणि 19 नोव्हेंबर 2024 ला एकूण चार कोटी रुपये दिले. तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचं प्रमोशन केलं नाही किंवा कोणतीही पटकथा फायनल केली नाही, असा दावा आरुषीनं केला आहे. अखेर त्यांनी आरुषीलाच चित्रपटातून काढून टाकले. त्यानंतर जेव्हा तिनं तिचे पैसे परत मागितले तेव्हा तिला सांगण्यात आलं की तिच्या जागी दुसरी अभिनेत्रीला घेण्यात आलं आहे. तिनं हे देखील सांगितलं की निर्मात्यांनी सोशल मीडियावर तिचा अपमान केला. त्याचं कारण म्हणजे त्यांनी चित्रपटाच्या टीमचा जो फोटो शेअर केला, त्यातून मुद्दामून तिला काढून टाकण्यात आलं आणि तिचं नाव देखील काढण्यात आलं.
हेही वाचा : रस्त्यावर परफॉर्म करणाऱ्या ED Sheeran ला पोलिसांनी थांबवलं अन्...; बंगळुरुच्या रस्त्यावर नेमकं घडलं काय?
आरुषीविषयी बोलायचं झालं तर ती स्परश गंगा या एनजीओची ती को-फाउंडर आहे. ही संस्था नमामि गंगे मोहिमेद्वारे गंगा नदी स्वच्छ करण्याचे काम करते. तिची प्रोडक्शन कंपनी असून हिमश्री असं त्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीतून तिनं मेजर निराला हा चित्रपट बनवला. हा चित्रपट तिचे वडील डॉ. रमेश पोख्रियल यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. तिचे वडील हे भारताचे शिक्षणमंत्री होते.