Junk food: जंक फूड म्हणजे असे खाद्यपदार्थ ज्यामध्ये साखर, फॅट, मीठ आणि कॅलरीज खूप जास्त असतात, पण पोषक घटक फारच कमी प्रमाणात असतात. या अन्नातून शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पोषण मिळत नाही. जंक फूडमध्ये बर्गर, पिझ्झा, चिप्स, सोडा, केक, फ्रेंच फ्राइज यांचा समावेश होतो.
आजकाल बरेच लोक आरोग्यदायी जेवणाच्याऐवजी बाहेर मिळणारे जंक फूड खाणे जास्त पसंत करतात. विशेषतः दुसऱ्या शहरात राहणारे विद्यार्थी किंवा नोकरी करणारे तरुण वेळ वाचवण्यासाठी बाहेरचे जंक फूड मोठ्या प्रमाणात खातात. स्वयंपाक करण्याचा कंटाळा येत असल्याने, जंक फूड त्यांना सोयीस्कर पर्याय वाटते. जरी हे फूड चविष्ट असले तरी याचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. या अन्नामध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे जास्त फॅट आणि मीठामुळे हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. जंक फूडमध्ये साखरही जास्त असल्याने डायबेटिसचा धोका देखील संभवतो. शिवाय, यामध्ये फायबर कमी असल्याने पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेलामुळे घश्याचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जंक फूड मर्यादित प्रमाणात खाणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला आरोग्यदायी जीवनशैली ठेवायची असेल, तर आठवड्यातून एक ते दोन वेळा जंक फूड खाल्ले तरी चालेल. काही पर्याय नसेल, आशा वेळीच जंक फूड खात जा. आजकाल सर्वांना जंक फूड खूप आवडतात, पण त्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवले पाहिजे. जर जंक फूड खाल्ल्यानंतर तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी होत असतील, तर त्याचे सेवन टाळणेच योग्य ठरेल.
जंक फूड्सची चव तोंडाला लागली की साधे जेवण खाण्याची इच्छाच होत नाही. मग आशा वेळी जर तुम्हाला जंक फूड खायची इच्छा झालीच, तर तुम्ही काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. जसे की कमी तेल वापरून बनवलेले, ताज्या भाज्यांचे सॅलाड, ग्रिल्ड चिकन किंवा पनीर घालून घरीच पिझ्झा बनवू शकता. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली, तर फ्रूट स्मूदी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय, हेल्दी स्नॅक्समध्ये ओट्स आणि नट्सना मसाला लाऊन खाणे फायद्याचे ठरू शकते. जंक फूड चविष्ट असले तरी त्याचे जास्त सेवन टाळणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आणि जंक फूडचे प्रमाण मर्यादित ठेवणे हेच योग्य आहे. हेल्दी पर्याय निवडून तुम्ही चव आणि आरोग्य दोन्ही जपू शकता.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)