म्हणे 90 तास काम करा... मुक्ताफळं उधळणाऱ्या 'एलअँडटी'च्या चेअरमनसाहेबांचा पगार किती माहितीये?

L&T chairman SN Subrahmanyan : इतका पगार असेल तर हे असं का म्हणणार नाहीत याचच गैर वाटेल. अनेकांचाच रोष ओढावणाऱ्या चेअरमन सुब्रमण्यन यांचा पगाराचा आकडा थक्क करणारा... पगारवाढीची टक्केवारी पाहून विश्वासच बसणार नाही.   

सायली पाटील | Updated: Jan 10, 2025, 08:05 AM IST
म्हणे 90 तास काम करा... मुक्ताफळं उधळणाऱ्या 'एलअँडटी'च्या चेअरमनसाहेबांचा पगार किती माहितीये? title=
what is the salary of the L&T chairman SN Subrahmanyan who says work 90 hours per week

L&T chairman SN Subrahmanyan : नोकरदारवर्गाला मिळणारा पगार, नोकरीच्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि सर्वात महतत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या हे काही महत्त्वाचे आणि कायमच चर्चेच असणारे मुद्दे. कोणाही कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची यावर स्वत:ची अशी काही मतं आहेत. अशा या नोकरदार वर्गामध्ये सध्या मात्र असंतोषाची लाट पाहायला मिळत आहे आणि यास कारण ठरत आहेत ते म्हणजे 'एलअँडटी'चे चेअरमन एसएन सुब्रमण्यन. 

हल्लीच एका कार्यक्रमादरम्यान सुब्रमण्यन यांना लार्सन अँड टुब्रो कंपनीची अब्जावधींची उलाढाल असतानाही त्यांच्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना शनिवारीसुद्धा कामावर यावं लागतं, यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत 'मला खंत आहे की मी लोकांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकत नाही. मला आनंदच होईल जर मी त्यांना रविवारीसुद्धा कामावर बोलवेन' असं काहीसं आश्चर्यकारक उत्तर त्यांनी दिलं. 

सुब्रमण्यन यांच्या मते रविवारी कर्मचाऱ्यांनी घरी वेळ व्यतीत करू नये. घरी बसून ही मंडळी करणार तरी काय? पत्नीला किती वेळ पाहणार किंवा पत्नी तुम्हाला किती वेळ पाहणार? असे वायफळ प्रश्न उपस्थित करत त्यांनी अनपेक्षित युक्तीवाद मांडला आणि त्यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी उपरोधिक सूरासह थेट शब्दांतही टीकेची झोड उठवली. 

किती पगार घेतात सुब्रमण्यन? 

सुब्रमण्यन यांच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चांचं रान माजलं. एका नेटकऱ्यानं तर थेट त्यांच्या पगाराकडेच लक्ष वेधलं. जिथं मागील आर्थिक वर्षामध्ये त्यांना 43 टक्के इतकी पगारवाढ मिळाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. गुंतवणूकदारांकडून दबाव असल्यानं त्यांना असं बोलावं लागत असेल असा खोचक अन् सणसणीत टोला नेटकऱ्यानं लगावला. प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या पगाराचा एकूण आकडा 51 कोटींच्या घरात असून, 2023 - 24 या आर्थिक वर्षात एस. एन. सुब्रमण्यन यांना कंपनीकडून पगारासमवेत पगारवाढ आणि इतर फायदे असा घसघशीत लाभ मिळाल्याचं सांगण्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : थंडीतही पावसाचीच सरशी; राज्याच्या कोणत्या भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट? 

 

दरम्यान, कंपनीतील उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीनं ओढावलेला रोष पाहता एलअँडटीकडूनही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथं राष्ट्रनिर्माणावर आपला विश्वास असून, हीच आपली प्राथमिकता आहे असं म्हणत हा एकत्र येऊन काम करण्याचा आणि प्रगतीच्या दिशेनं पावलं उचलण्याचा काळ असल्याचंही कंपनीच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.