Atul Subhash Wife: गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरुच्या AI इंजिनिअर अतुल सुभाषने आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता मोठे पाऊल उचलले आहे. अतुल सुभाषच्या पत्नीसह तीन जणांना अटक करण्यात आलं आहे. आरोपी निकिती सिंघानीयाला हरियाणाच्या गुरुग्राममधून अटक करण्यात आली आहे. निकिताव्यतिरिक्त तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांनाही प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींची माहिती मिळवण्यासाठी बेंगळुरु पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतली होती.
बेंगळुरुत इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या करण्याआधी पत्नीवर हिंसाचाराचा आरोप केला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी निकिता सिंघानीयाला हरियाणाच्या गुरुग्राममधून आणि तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या अलाहबादमधून अटक करण्यात आली आहे. एका अन्य पोलिस अधिकाऱ्याने याबाबत पुष्टी करत म्हटलं आहे की, तिघा आरोपींविरोधात अतुलच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी 3 कोटी रुपये आणि मुलाला भेटण्याचा अधिकार देण्यासाठी 30 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.
अतुल सुभाष त्याच्याच घरात सोमवारी मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याचा भाऊ विकास कुमारने सुभाषची पत्नी निकिता, तिची आई निशा आणि भाऊ अनुरागविरोधात तक्रार दाखल केली होती. या व्यतिरिक्त 34 वर्षीय अतुलने 24 पानांची सुसाइड नोट आणि 81 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यात व्हिडिओने म्हटलं होतं की, मी माझी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी पैशांची मशीन झालो आहे. माझ्याकडून पैसे उकळवून माझ्याचविरोधात त्याचा वापर करत आहेत. त्यामुळं मी आता हे मुळापासूनच संपवून टाकतो, असं म्हटलं होतं.
व्हिडिओत अतुलने त्याच्या मानेवर एक बोर्ड लटकवला होता की ज्यावर लिहलं होतं की न्याय मिळायला हवा. त्याने हा देखील आरोप केला होता की, उत्तर प्रदेशच्या एका कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश त्याच्या सासरच्या मंडळीची बाजू घेतात, असं म्हटलं होतं. सुभाष बेंगळुरुमध्ये एका ऑटोमोबाइल फर्ममध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी 2019 मध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनल निकितासोबत लग्न केले होते. मात्र नंतर ते वेगळे झाले होते. अतुल सुभाषवर हत्या, हुंडा, अनैसर्गिक संबंधसह एकूण 9 तक्रारी दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये तर त्यांच्या आई-वडिलांनाही आरोपी केले आहे.