तुरुंगातून जॅकलिनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशचं निर्मला सितारमण यांना पत्र; 'माझ्या 76400000000 रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स...'

Sukesh Chandrasekhar: फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 12, 2025, 07:39 PM IST
तुरुंगातून जॅकलिनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशचं निर्मला सितारमण यांना पत्र; 'माझ्या 76400000000 रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स...' title=
सुकेश चंद्रशेखर

Sukesh Chandrasekhar: कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर याला 2015 मध्ये अटक करण्यात आली. दरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्णांडिससोबतच खासगी फोटो त्याने सोशल मीडियात व्हायरल केले. आमच्या दोघांचे प्रेम असून आपण कोट्यवधीच्या वस्तू तिला गिफ्ट केल्या असल्याचे त्याने सांगितले. तुरुंगात असूनही जॅकलिनला प्रेमपत्र पाठवणाऱ्या सुकेशने आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना पत्र लिहिले आहे. काय म्हटलंय या पत्रात? जाणून घेऊया.  

फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असणाऱ्या आरोपी सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवले आहे. यामध्ये 2024 साठीचे त्यांचे घोषित 7640 कोटी रुपयांचे परकीय उत्पन्न संबंधित सरकारी कर योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे. सुकेशने निर्मला सीतारमण यांना एका पत्राद्वारे विनंती केली आहे. नेवाडा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत माझे परदेशी व्यवसाय आहेत. एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन, ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग आणि बेटिंगमध्ये पैसे गुंतले असल्याचेही त्याने सांगितले.

अमेरिकेपासून दुबईपर्यंतचा व्यवसाय

सुकेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा व्यवसाय अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँगमध्ये सुरु आहे. भारतातील सर्व प्रलंबित आयकर वसुलीच्या अॅक्शन आणि अपीलांचा निपटारा करण्यास आपण तयार असल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हंटलय. तसेच सुकेश चंद्रशेखर याने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. मी माझ्या परकीय उत्पन्नावरील कर भरून आणि तो देशात गुंतवून भारताच्या विकासात योगदान देऊ इच्छितो, असे सुकेशने म्हटलंय.

मला कर भरायचाय

सुकेशने आपल्या पत्रात पुढे म्हटलंय की, आजपासून एक अभिमानी भारतीय म्हणून आपले पंतप्रधान मोदीजींच्या महान नेतृत्वाखाली मला या महान राष्ट्राच्या जागतिक दर्जाच्या विकासात योगदान द्यायचे आहे.आतापासून मी माझ्या परदेशी उत्पन्नावर स्वेच्छेने भारतीय कर भरेन. माझे परदेशातील उत्पन्न भारतात गुंतवेल, असेही तो पुढे म्हणाला. यासाठी मी 2024 सालासाठी माझे 7640 कोटी रुपयांचे कायदेशीर परकीय उत्पन्न जाहीर करत आहे, असे फसवणुकीचा आरोप असलेल्या सुकेशने लिहिले. तसेच मी भारतीय कर कायद्यांनुसार योग्य कर तात्काळ भरू इच्छितो, असेही सुकेशने आपल्या पत्रात लिहिलंय.