2017 ला JEE मध्ये 360 पैकी 360 गुण मिळवू देशात पहिला, लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड; कल्पित 7 वर्षानंतर काय करतोय?

Kalpit Veerwal Success Story: कल्पित हा कोटा कोचिंग गर्दीपेक्षा वेगळा होता. तो स्वत:च्या गावी राहिला. शाळा, सेल्फ स्टडी आणि कोचिंग असा त्याचा दिवस जायचा.

Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2025, 03:23 PM IST
2017 ला JEE मध्ये 360 पैकी 360 गुण मिळवू देशात पहिला, लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड; कल्पित 7 वर्षानंतर काय करतोय? title=
कल्पित वीरवाल

Kalpit Veerwal Success Story: 2017 मध्ये झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत राजस्थानमधील उदयपूरच्या कल्पित वीरवालने इतिहास रचला. त्याने परीक्षेत 360 पैकी 360 गुण मिळवले आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. लाखो विद्यार्थी जे स्वप्न पाहतात, ते स्वप्न कल्पितने प्रत्यक्षात उतरवले होते.कल्पितचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडील पुष्कर लाल हे उदयपूरच्या महाराणा भूपाल सरकारी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करायचे. त्याची आई पुष्पा वीरवाल या शाळेत शिक्षिका होत्या. आई-वडिलांना शिक्षणाचे महत्व कळत होते आणि कल्पितने त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे त्यांना वाटायचे. 

कल्पित हा कोटा कोचिंग गर्दीपेक्षा वेगळा होता. तो स्वत:च्या गावी राहिला. शाळा, सेल्फ स्टडी आणि कोचिंग असा त्याचा दिवस जायचा. तो दिवसाचे 16 तास अभ्यास करणाऱ्यांपैकी नव्हता.  असे असले तरी तो अनेक राष्ट्रीय ऑलिंपॅडमधील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KVPY) स्कॉलर आणि राष्ट्रीय प्रतिभा शोध स्कॉलर (NTSE) मध्येही असायचा. 'मी दिवसातून 15-15 तास अभ्यास केला नाही, आयआयटीच्या तयारीसाठी मी नेहमीच्या 'कोटा मार्गाने' गेलो नाही, पण सातत्यपूर्ण केलेल्या अभ्यासाने मला खूप मदत झाल्याचे कल्पित सांगतो.

 युट्यूब चॅनलवर 1 लाख सबसक्रायबर 

जेईई उत्तीर्ण झाल्यानंतर कल्पित आयआयटी बॉम्बेच्या कॉम्प्युटर सायन्स प्रोग्राममध्ये सहभागी झाला. पदवीधर होणे, प्लेसमेंटसाठी बसणे, उच्च पगाराची नोकरी मिळवणे असा विचार सर्वसाधारणपणे तरुण करतात पण कल्पित यापैकी नव्हता. प्लेसमेंटच्या मागे न लागण्यासाठी त्याला पुरेसे पैसे कमवायचे होते. त्यामुळे तो शैक्षणिक क्षेत्रातपुरता मर्यादित राहिला नाही. तो एक सिनीअर एनसीसी कॅडेट बनला, कठोर शस्त्रास्त्र कवायती, शिबिरे आणि प्रशिक्षणानंतर त्याने एनसीसी ए प्रमाणपत्र मिळवले. आयआयटीमध्ये असताना त्याच्या दुसऱ्या वर्षात त्याने एक यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. यामध्ये तो अभ्यासाची धोरणे आणि जेईई तयारीच्या टिप्स शेअर करत होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना कल्पितने आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी व्यावहारिक सल्ला दिला. त्यामुळे सामान्य कोचिंग सेंटर्स देत असलेल्या टीप्सपेक्षा कल्पित नेहमीत वेगळा वाटला. २०१९ मध्ये त्याच्या युट्यूब चॅनलवर 1 लाख सबसक्रायबर पूर्ण झाले. यानंतर त्याच्या AcadBoost ला सिल्व्हर प्ले बटण मिळाले. या यशामुळे त्याने हेच काम पुढे नेण्याचा विचार केला.

ACADBOOST चा जन्म

कल्पितने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत करण्यासाठी AcadBoost हा एक ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्म सुरू केला. त्याचा विस्तार करण्यासाठी त्याने इंटर्नशिप देखील सोडली.पुढच्या वर्षी त्याने वेबसाइटसाठी त्याचा पहिला ऑनलाइन कोर्स विकसित केला आणि तो एक जबरदस्त यशस्वी ठरला. त्याने IIT बॉम्बेच्या कॉम्प्युटर सायन्स विभागात मिळणाऱ्या सर्वोच्च पॅकेजपेक्षा जास्त पैसे कमावले. AcadBoost दरमहा नफा कमवत होते. शेवटच्या वर्षात कल्पितने एक धाडसी निर्णय घेतला. त्याने त्याचा IIT बॉम्बे प्रोग्राम एक सेमिस्टर लवकर संपवला. त्याने कोणत्याही प्लेसमेंट किंवा कॉर्पोरेट नोकरीच्या शोधात न जाण्याचा निर्णय घेतला. तो AcadBoost टेक्नॉलॉजीजमध्ये पूर्णपणे सामील झाला होता. 2021 पर्यंत लिंक्डइनने त्याचे नाव त्यांच्या 'टॉप व्हॉइसेस'मध्ये ठेवले. 20 उत्कृष्ट तरुण व्यावसायिकांच्या यादीत तो सर्वात तरुण उमेदवार होता. परिपूर्ण JEE स्कोअरर ते उद्योजक असा त्याचा प्रवास त्याने टेडेक्स टॉकवर शेअर केला.

जगतोय साधारण जीवनशैली

खासगी इक्विटी कंपन्या आणि एडटेक दिग्गज कंपन्यांकडून त्याच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची, तो विकत घेण्याची ऑफर त्याला देत असत. पण कल्पितने वेळोवेळी या गोष्टीला नकार दिला. त्याने स्वातंत्र्य निवडले आणि आपल्याला मिळालेला नफा अनेक व्यवसाय, स्टॉक आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवला. कल्पित आजही सामान्य जीवन जगतो. JEE ची तयारी करतानाही, त्याने क्रिकेट, टीव्ही, बॅडमिंटन आणि म्युझिकसाठी वेळ काढला. कोटा कोचिंग सेंटर्सनी त्याला व्हीआयपी हॉस्टेल आणि इतर सुविधा देऊ केल्या. असे असतानाही त्याने उदयपूरमध्ये राहणे पसंत केले.

कल्पितकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी

आज कल्पित वीरवाल हा फक्त 360 पैकी 360 गुण मिळवणारा मुलगा नाही तर त्याहूनही अधिक आहे. तो एक उद्योजक, TEDx वक्ता आणि भारतातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनलाय. केवळ जास्त गुण मिळवणे म्हणजे यश नाही. तर करिअरप्रती असलेला तुमचा दृष्टीकोन, रणनीती आणि सामान्य जीवनशैलीचा मार्ग स्वीकारण्यात धाडस लागते, हे कल्पितकडून शिकता येण्यासारखे आहे.