अहमदाबाच्या कांकरिया तलावाजवळ असणाऱ्या प्राणी संग्रहालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला. तरुण 20 फूट उंच संरक्षक जाळी ओलांडून पिंजऱ्याच्या आत असणाऱ्या झाडावर पोहोचला होता. वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणाविरोधात मणिनगर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा कलम 38J आणि बीएनएसची कलम 125 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, तरुण वाघाच्या पिंजऱ्याबाहेर लावण्यात आलेल्या जाळीच्या आधारे वर चढला आणि आतमध्ये असणाऱ्या झाडाच्या आधारे खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तो वाघाकडे पाहून काहीतरी इशारेही करत होता. पिंजऱ्याच्या बाहेर असणारे लोक यावेळी ओरडून त्याला बाहेर येण्यास सांगत होता. लोकांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर सुरक्षा कर्मचारी तिथे दाखल होतात.
बाहेर येताना अरुणचा पाय झाडावरुन घसरतो. पण सुदैवाने तो खाली पडत नाही. यानंतर अरुण पुन्हा एकदा झाडाच्या आधारे वरती येतो आणि नंतर पिंजऱ्याच्या बाहेर पडतो. यादरम्यान सुरक्षा कर्मचारी त्याला पकडतात आणि पोलिसांकडे सोपवतात.
मणिनगर पोलिसांनी सांगितलं आहे की, अहमदाबादच्या रखियालमध्ये राहणारा 26 वर्षीय अरुण पासवान रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास जाळी ओलाडूंन पिंजऱ्यात प्रवेश केला होता.
अरुण मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असून, अहमदाबादमध्ये नोकरी करतो. अरुणविरोधात प्राणी संग्रहालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एफआयआर दाखल केली आहे. तरुणाविरोधात मणिनगर पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा कलम 38J आणि बीएनएसची कलम 125 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान तरुणाने ज्याप्रकारे पिंजऱ्यात प्रवेश केला होता त्यानंतर प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तरुण अत्यंत सहजतेने जाळी ओलांडून आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही प्रश्न निर्माण होत आहे.