तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे होता? मोठ्या भावाने केलं उघड, 'काही दिवसांपूर्वी दुबईला...'

शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र नंतर तो बेपत्ता नसून मित्रांसह गेल्याच समोर आलं. आता त्याच्या मोठ्या भावाने नेमकं काय झालं होतं हे उघड केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 11, 2025, 05:02 PM IST
तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे होता? मोठ्या भावाने केलं उघड, 'काही दिवसांपूर्वी दुबईला...' title=

शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनीही तात्काळ याची दखल घेत तपास सुरु केला होता. तानाजी सावंत यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आणि नंतर पत्रकार परिषदही घेतली. तपास केला असता मुलगा बेपत्ता नसून खासगी विमानाने परदेशात गेल्याचं उघड झालं होतं. यानंतर हे विमान पुन्हा पुण्यात आणलं गेलं. यादरम्यान तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत याने नेमकं काय झालं होतं हे सांगितलं आहे. 

"माझा छोटा भाऊ काही दिवसांपूर्वी दुबईला गेला होता. त्यानंतर त्याला बिजनेस डीलच्या संदर्भात बँकॉकला जायचे होते. त्यासाठी तो खासगी चार्टरने निघाला होता. परंतु घरी कोणाला यासंदर्भात कल्पना नसल्याने हा सगळा गोंधळ झाला," असं गिरीराज सावतंने सांगितलं आहे. 

नेमकं काय घडलं? 

सोमवारी संध्याकाळी तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर आल्या आणि एकच खळबळ उडाली. काहींनी तर त्याचे अपहरण झाल्याचे दावे केले. पण नंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि तानाजी सावंत यांनी एकत्रित परिषद घेत अपरहण झालं नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच तानाजी सावंत यांचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र चार्टर विमानाने बँकॉकला निघाले होते. आम्ही ट्रॅक केल असून त्यांना परत बोलावण्यात आलं आहे.  ते सुखरूप आहेत.  ते न सांगता का निघून गेले होते याविषयी चर्चा चौकशी सुरु आहे असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं. 

तानाजी सावंत यांनी यावेळी त्याचा माझा काही वाद नाही, काही भांडण नाही. तो 8 ते 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता. तो लगेच का परत गेला कळलं नाही त्यामुळे चिंता लागली होती असं सांगितलं होतं. 

दरम्यान पुणे पोलिसांनी मुलगा विमानाने बँकॉकला गेल्याची माहिती मिळताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क साधला होता. तसंच विमानाच्या कॅप्टनशीही संपर्क साधला. त्यांनी विमान बँकाँकला न नेता पुन्हा पुण्याकडे वळवण्याची सूचना केली. त्यानंतर विमान विशाखापट्टणम येथील विमानतळावर उतरवण्यात आले. यानंतर सोमवारी रात्री उशिरा लोहगाव विमानतळावर ते पोहोचले. 

सुषमा अंधारे यांची टीका

"तानाजी सावंत यांचा मुलगा न सांगता बँकॉकला निघून गेला. त्याला अडवण्यासाठी सावंत यांनी पोलीस यंत्रणा कामाला लावली. सत्ता आणि पैशाच्या जोरावर यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. अपहरण झालेलं नसताना अपहरण झाल्याचे सांगून पोलीस यंत्रणेला वेठीस धरल गेलं. सामान्य नागरिकाची साधी एनसी वेळेत दाखल होत नाही. माजी मंत्र्याच्या मुलासाठी मात्र सत्तेचा पाहिजे तसा वापर सुरू आहे. असा या सरकारचा कारभार आहे," अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. 

सुप्रिया सुळे यांनीही टीका केली असून, 60 दिवसापासून कृष्णा आंधळे मिळत नाही. पण तानाजी सावंताच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवले. पण बीडच्या आरोपीला पकडले नाही असं शब्दांत निशाणा साधला आहे.