फक्त 3 डबे, 9 किमीचा प्रवास; ही आहे भारतातील सर्वात लहान ट्रेन, एकदातरी करा प्रवास

Shortest Train India: गोष्ट एका इवल्याशा रेल्वे प्रवासाची. पर्यटकांमध्ये या रेल्वे प्रवासाची कमालीची लोकप्रियता. पाहा कुठून कुठपर्यंत सुरू राहतो हा प्रवास...   

सायली पाटील | Updated: Feb 17, 2025, 01:59 PM IST
फक्त 3 डबे, 9 किमीचा प्रवास; ही आहे भारतातील सर्वात लहान ट्रेन, एकदातरी करा प्रवास
Shortest Train India 9 km train route Cochin to Ernakulam train journey

Shortest Train India: जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेनं कायमच प्रवाशांच्या गरजा आणि देशाची भौगोलिक रचना लक्षात घेत काही महत्त्वाच्या सुविधा पुरवल्या. देशात ज्याप्रमाणं भारतीय रेल्वेनं लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेगाड्यांची पूर्तता केली, अगदी त्याचप्रमाणे कमी अंतराच्या प्रवासासाठीसुद्धा रेल्वेनं तरतूद केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रवासाचं अंतर कमी असलं तरीही प्रवाशांसाठी हे कमी अंतर आणि प्रवासाचा अनुभवही तितकाच महत्त्वपूर्ण ठरत आहे. 

कमी अंतराच्या रेल्वेप्रवासाविषयी सांगावं तर, देशातील सर्वात कमी अंतराच्या प्रवासासाठी केरळमध्ये एक ट्रेन धावते. अवघ्या 9 किमी अंतरापुरताच हा प्रवास असून, या ट्रेनला फक्त आणि फक्त तीन डबे आहेत. भारतातील सर्वात लहान ट्रेन अशीही या ट्रेनची ओळख. ही ट्रेन कोचीन हार्बर टर्मिनस सीएचटी ते एर्नाकुलम जंक्शन या स्थानकांदरम्यान धावते. 

लहान प्रवासासमवेत ही ट्रेन आणखीही अनेक कारणांमुळं चर्चेचा विषय ठरते. हिरव्या रंगाची ही डीएमयू ट्रेन दिवसातून दोन वेळा चालवण्यात येते. केरळातील हिरव्यागार क्षेत्रातून ही ट्रेन पुढे जाते, निसर्गाच्या सानिध्ध्यातील रुळांवरून प्रवास करते. 

9 किमीचं अंतर या ट्रेननं 40 मिनिटांत ओलांडता येतं. भारतात फक्त ही एकच नव्हे, तर बरकाकाना-सिधवार पॅसेंजर, गढ़ी हरसरू-फर्रूखनगर डीईएमयू आणि जसीडीह-बैद्यनाथधाम मेमू या ट्रेनही कमी अंतराच्या प्रवासासाठी सेवेत हजर असतात.  कमी अंतरासाठीच्या ट्रेनमध्ये 300 प्रवाशांची आसनक्षमता असली तरी प्रत्यक्षात मात्र या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. प्रवासाची सुरुवात करतेवेळी या रेल्वेमध्ये अवघे 10 ते 12 प्रवासी असतात. 

हेसुद्धा वाचा : साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना...; 500 चं पूजासाहित्य 4000 रुपयांना विकत परदेशी भाविकांना गंडा 

कमी प्रवासीसंख्येमुळं दक्षिण भारतातील या रेल्वेसेवेला कायमस्वरुपी पूर्णविराम देण्याचा निर्णय आतापर्यंत रेल्वे विभागानं अनेकदा घेतला आहे. पण, तरीही आजसुद्धा ही रेल्वे सेवेत आहे हे खरं. या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांमध्ये स्थानिकांचा आकडा मोठा आहे. असं असलं तरीही पर्यटकांमध्येही या रेल्वेचं कमाल आकर्षण पाहायला मिळतं. केरळ सफरीवर येणारे अनेक प्रवासी या रेल्वेनं प्रवास करण्यास कायमच उत्सुक असतात. नैसर्गिक सौंदर्यानं भारावून जात ते या अनोख्या रेल्वे प्रवासाचा न विसरता अनुभव घेतात. काय मग, तुम्ही कधी येताय सर्वात लहान रेल्वे प्रवास करायला?