अमेठी : NDRF च्या पथकाने रविवारी मुलीचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहिम राबवली. 11 वर्षांची मुलगी चंचलचा शोध सुरु होता. पण आई-वडील काहीही सांगायला तयार नव्हते. सोमवारीही सकाळपासूनच पथकाने मृतदेहाचा शोध सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येनंतर आई वारंवार बेशुद्ध पडल्याचे नाटक करत होती मात्र तिने पोलिसांना सत्य सांगितले नाही. आई-वडील दोघेही आधी आपले म्हणणे बदलून पोलिसांची दिशाभूल करत राहिले. यानंतर आई-वडील दीदीला घेऊन गेल्याचे मुलगा आरवने सांगितल्यावर पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी या दाम्पत्याची कसून चौकशी केली असता घटनेचे संपूर्ण सत्य समोर आले. क्षुल्लक कारणावरून आई वडिलांनी आपल्या मुलीला पाण्यात फेकून दिलं. ती बुडत होती पण त्यांना काहीच वाटत नव्हतं. आई-वडिलांनी 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी चंचलला गंगानगरमध्ये पाण्यात फेकून दिले होते. यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान दोघांचा जबाब विरोधाभास व संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी या दाम्पत्याची कसून चौकशी केली. त्यात त्यांनी दोघांनी मिळून मुलीला पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली. चंचल मुलांशी फोनवर बोलायची. त्यामुळे ते नाराज होते. अनेकवेळा ताकीद देऊनही मुलगी ऐकत नसल्याने या दाम्पत्याने आपल्याच मुलीचा जीव घेतला.
चंचल ही इयत्ता पाचवीत शिकत होती. शिक्षक म्हणतात की ती एक शांत मुलगी होती. अनेक तासांपासून शोध मोहीम सुरु आहे. मात्र अद्यापपर्यंत चंचलचा काहीही पत्ता लागलेला नाही.पालक आपल्या मुलीशी असे कसे वागू शकतात यावर नातेवाईकांचा विश्वास बसत नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.