Muhurat Trading 2023 : आपण सर्वजण दिवाळीची वाट पाहत आहोत. अनेकांनी दिवाळीसाठी (Diwali 2023) खास नियोजन देखील केलंय. शॉपिंगपासून ते साफसफाई पर्यंतची तयारी सुरू झालीये. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार (Share Market) बंद असतो. मात्र, एका खास प्रसंगी शेअर बाजार उघडतात आणि या काळात होते ती मुहुर्त ट्रेडिंग... मुहुर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) म्हणजे काय? या दिवशी गुंतवणूकदार नेमकं काय करतात? असा सवाल अनेकांना पडला असेल. याचं उत्तर जाणून घेऊया...
राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी ओपन असणार आहे. या काळात प्री-ओपनिंग सत्र 8 मिनिटांसाठी असेल. संध्याकाळी 6 ते 6.08 वाजेपर्यंत हे सत्र असेल. तर ब्लॉक डील विंडो 5:45 वाजता उघडणार आहे. यानंतर सायंकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत बाजारात सामान्य गुंतवणुकदारांसाठी बाजार खुला असणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी 6.20 ते 7.05 वाजेपर्यंत कॉल ऑक्शन सेशन असणार आहे. तर क्लोजिंग सेशन सायंकाळी 7.15 ते 7.25 वाजेपर्यंत असेल.
शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा आत्ताची नाहीतर पाच दशकांहून अधिक जुनी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE मध्ये १९५७ मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE मध्ये १९९२ मध्ये मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा सुरू झाली.बहुतेक लोक या दिवशी शेअर्स खरेदी करण्यास प्राधान्य देतात, ही गुंतवणूक सहसा खूप छोटी आणि प्रतीकात्मक असते. मुहूर्ताचा व्यवहार हा पूर्णपणे परंपरेशी निगडित असल्याचं शेअर मार्केटमधील तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, मुहूर्त ट्रेडिंग केल्याने समृद्धी आणते आणि गुंतवणूकदारांसाठी वर्षभर संपत्ती आणते, असं मानलं जातं. यावेळी गुंतवणूकदार मूल्याधारित स्टॉक खरेदी करतात, जे दीर्घ मुदतीसाठी चांगले असतात. यादिवशी बाजारात नेहमी वाढ झाल्याचं दिसून येतं. दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ होते. दिवाळीचा दिवस कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे बाजारात फायदा व्हावा यासाठी मुहूर्त ट्रेंडिगची परंपरा सुरू झाली, असा एक अंदाज देखील व्यक्त केला जातो.