पोलिसांचा आरोपी सुशील कुमारबरोबर सेल्फी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हत्येतल्या आरोपीबरोबर सेल्फी घेण्याचा पोलीस कर्मचाऱ्यांना मोह

Updated: Jun 25, 2021, 04:40 PM IST
पोलिसांचा आरोपी सुशील कुमारबरोबर सेल्फी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल title=

नवी दिल्ली : कुस्तीपटू सागर धनकडच्या (Sagar Dhankhar Murder Case) हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू सुशील कुमारला (Sushil Kumar) तिहार जेलमधून (Tihar Jail) दिल्लीतल्या मंडोली तुरुंगात हलवण्यात आलं. मंडोली तुरुंगातल्या बराक नंबर 2 मध्ये सुशील कुमारला ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, तिहार जेलमधून बाहेर निघताना काही पोलीस कर्मचाऱ्यांना सुशील कुमारबरोबर सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. पण आता या सेल्फीमुळे हे पोलीस कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. आरोपी सुशील कुमारबरोबरचा हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ऑलिम्पिक पदक विजेता ते खुनातील आरोपी
2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये 66 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावणाऱ्या सुशील कुमारने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्येही रौप्य पदक पटकवण्याची किमया केली. यानंतर सुशील कुमार नावाला वलय प्राप्त झालं. पण हिरो ठरलेला सुशीलकुमार युवा कुस्तीपटू सागर धनकड हत्येनं व्हिलन ठरला.

 

नेमकं काय आहे प्रकरण

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर 4 मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा कुस्तीपटू सागर राणा याच्यासोबत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोघे जखमी देखील झाले होते. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

सुशील कुमारवर होतं 1 लाखांचं बक्षीस
सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता. या घटनेपासून सुशील कुमार फरार होता. सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केलं होतं. अखेर त्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं.

नरसिंग यादवबरोबरही होता वाद
खरंतर दोन कुस्तीपटूंची लढाई मॅटवर नाहीतर कुस्तीच्या आखाड्यातच चांगली रंगते. पण, सुशीलने आखाडा सोडून नको तो मार्ग स्वीकारला. नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकला जाता येऊ नये म्हणून सुशील कुमारच्या माणसांनी नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करून उत्तेजक चाचणीत त्याला फेल करवलं असा आरोप सुशील कुमारवर झाला. पाच वर्षांपूर्वी त्यावरून भरपूर वादळ झालं होतं.