Ramdas Aathawale Disppoint: नुकताच महाराष्ट्राच्य मंत्रिमंडळ पदाचा विस्तार पार पडला. यात भाजप एकूण 19 ( यात ३ राज्यमंत्री) , शिवसेना एकूण 11 ( यात 2 राज्यमंत्री), राष्ट्रवादी एकूण 9 (1 राज्यमंत्री) पदाचा समावेश आहे. या शपथविधीनंतर महायुतीतले अनेक नेते नाराज आहेत. यात महायुतीसोबत असलेले रामदास आठवले आघाडीवर आहेत. आठवलेंनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखवली आहे. काय म्हणाले आठवले? जाणून घेऊया.
निवडणुका येतात तेव्हा मला सगळीकडे घेऊन जातात. पण मी महायुतीचा एक भाग असून मला याचे निमंत्रण देखील नाही. विधानसभेच्या निवडणुकीत बुद्धीष्ट, आंबेडकरी समाज महायुतीसोबत होता. लोकसभा, विधानसभेला आम्हाला एकही जागा दिली न्हवती. देवेंद्र फडणवीसांसोबत आमची 8-10 वेळा चर्चा झाली होती. आमची चर्चा झाली. त्यांनी आम्हाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. अडीच वर्षाच्या सरकारमध्येही आरपीआयला एकही मंत्रिपद नव्हते. गावागावात आमचा रिपब्लिकन पार्टीचा समाज आहे. आता त्यांना मी कसं तोंड दाखवू हा प्रश्न मला पडलाय, असे दु:ख आठवलेंनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदींनी मला केंद्रात मंत्रिपद दिलय. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्यांनाही सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. आम्ही फडणवीसांची भेट घेतली. यावेळी आरपीआयला संधी मिळेल, असे ते सारखे म्हणायचे. पण आजपर्यंत आम्हाला मंत्रिपदासाठी कोणताही फोन आला नाही. त्यामुळे मीदेखील नाराज आहे. कार्यकर्तेदेखील नाराज आहे, असे आठवले म्हणाले. रिपब्लिकन पार्टी मोठा समूह आहे. अशा पार्टीकडे दुर्लक्ष करायला नको होते. 2 मंत्रिपद राहिले आहेत. तिथे रिपाईला संधी मिळावी. पुढे महापालिका निवडणुका आहेत.तिथे आमचा विचार केला जावा, असे रामदास आठवले म्हणाले.
भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे,राधाकृष्ण विखे पाटील,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,गणेश नाईक,मंगलप्रभात लोढा,जयकुमार रावल,पंकजा मुंडे,अतुल सावे,अशोक उईके,आशिष शेलार,शिवेंद्रराजे भोसले,जयकुमार गोरे,संजय सावकारे,नितेश राणे,आकाश फुंडकर,माधुरी मिसाळ,पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली.शिवसेनेत गुलाबराव पाटील,दादा भुसे,संजय राठोड,उदय सामंत,शंभुराज देसाई,संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,भरत गोगावले, प्रकाश आबिटकर,आशिष जायस्वाल आणि योगेश कदम यांनी शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला मात्र फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मविआत सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेला 20 जागा मिळाल्या. मनसेला तर एकही जागा जिंकता आली नाही.