Zakir Hussain Death: झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन

Zakir Husain Death:  जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Pravin Dabholkar | Updated: Dec 15, 2024, 11:19 PM IST
Zakir Hussain Death: झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन  title=
झाकीर हुसैन

Zakir Husain Death: जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादर सुरु होते. झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे चाहते आणि संगीत जगतात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली आणि वाहिली जात आहे. या कधीही भरून न येणाऱ्या नुकसानाबद्दल जगभरातील संगीतप्रेमी आणि कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या जगात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी ओळखले जात होते. 1951 मध्ये तबला वादक उस्ताद अल्ला रखा यांच्या पोटी जन्मलेल्या झाकीर हुसैन यांनी लहानपणापासूनच आपले संगीत कौशल्य दाखवायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर सादरीकरण करून तबल्याला नवी ओळख दिली.

संगीत क्षेत्रात अविस्मरणीय योगदान

झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. 1970 मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत, "शक्ती" नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली.

चित्रपटात, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभा 

झाकीर हुसेनने केवळ रंगमंचावरच नव्हे तर चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय संगीत प्रकल्पांमध्येही आपली प्रतिभा सिद्ध केली. ‘हीट अँड डस्ट’ आणि ‘इन कस्टडी’ या चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले. 

पुरस्कार

झाकीर हुसेन यांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ज्यात पद्मभूषण, पद्मश्री आणि ग्रॅमी पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांच्या सांगीतिक प्रवासाने भारतीय शास्त्रीय संगीताला नव्या उंचीवर नेऊन जगभर लोकप्रिय केले.

संगीत क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान

उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत जगताचे मोठे नुकसान आहे. त्यांनी तबल्याला जागतिक मान्यता तर दिलीच, शिवाय नव्या पिढीच्या संगीतकारांसमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनाने संगीतविश्वातील पोकळी भरून निघणे अशक्य आहे. त्यांच्या आठवणी आणि त्यांचे संगीत त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत राहील. भारतीय संगीताला जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महान कलाकाराला संपूर्ण जग सलाम करत आहे.