दिल्लीमधील एका व्यक्तीने फूड डिलिव्हरी अॅपवरुन चिकण बिर्याणीची ऑर्डर दिली होती. पण ही ऑर्डर डिलिव्हर झाली तेव्हा त्याच्यासह नैतिकतेचे धडेही देण्यात आले. डिलिव्हरी एजंट बिर्याणी घेऊन आला असता त्याने 'चिकण आणि मटण फक्त दिवाळीनंतर' असा सल्ला दिला आहे. फक्त बिर्याणी येईल अशी अपेक्षा असणाऱ्या या व्यक्तीला आपल्याला न मागितलेला सल्लाही मिळेल अशी अपेक्षा नव्हती. Reddit युजरने आपला अनुभव शेअर केला आहे. डिलिव्हरी एजंटने फक्त ओटीपी मागितला नाही, तर त्याच्यासह न विचारता आपलं मतही सांगितलं.
"जे तुम्ही करत आहात ते योग्य नाही," असं डिलिव्हरी एंजटने हिंदीत सांगितलं. "मटण आणि चिकन दिवाळीनंतर खा, तोपर्यंत स्वच्छ आणि चांगलं अन्न खा," असा सल्ला यावेळी डिलिव्हरी एजंटने दिला. असं काही होईल याची अपेक्षा नसल्याने आपण फक्त गुन्हा केल्याप्रमाणे हसत होतो असं रेडिट युजरने सांगितलं आहे. "मी यावर काय बोलू शकणार होतो? त्याला चिंता करण्याची काय गरज?," असं त्याने म्हटलं आहे.
डिलिव्हरी एंजटने सल्ला दिल्यानंतर Reddit युजरच्या मनात इतर शंका निर्माण झाल्या होत्या. जर तो असा सल्ला देत हस्तक्षेप करत असेल तर बिर्याणीमध्ये त्याने काही वेगळे घटक टाकले असावेत अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती.
"मी काय करावं? माझ्याकडे त्याचं नाव आणि नंबर आहे. त्यालाही मी कुठे राहतो हे माहिती आहे. जर मी त्याची तक्रार केली तर तो उगाच मला त्रास देऊ शकतो," अशी शंका त्याने व्यक्त केली. रेडिट युजरने शेअर केलेली ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अनेकांनी त्यावर आपलं मत मांडलं. काही वेळाने यावर चर्चासत्रच सुरु झालं.
"तो त्याची मूल्यं तुझ्यावर का लादत आहे? त्याला सांग की मग तू चिकन डिलिव्हरी करु नको," असं एका युजरने म्हटलं. तर एकाने लिहिलं आहे की, "या प्रकारचं नैतिक पोलिसिंग, ही माझी सर्वात मोठी भीती होती". दरम्यान युजरने आपण अॅपच्या कस्टमर सपोर्टकडे तक्रार केल्याची माहिती कमेंटमध्ये दिली आहे.