नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकमधील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी बोलताना मोदींनी दुसऱ्या महायुद्धानंतर आज देशात सर्वात मोठं संकट आलं आहे. महायुद्धानंतर ज्याप्रमाणे जग बदललं होतं, त्याचप्रमाणे कोरोनानंतर संपूर्ण जग पूर्णपणे बदलणार आहे.
पीएम मोदी म्हणाले की, यापूर्वी जागतिकीकरणाबाबतच्या आर्थिक विषयावर चर्चा होती, पण आता मानवतेच्या आधारे चर्चा होणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत, भारताने गेल्या 6 वर्षात मोठे निर्णय घेतले आहेत. आयुष्मान भारत योजनेमुळे देशात अनेकांना लाभ मिळाला आहे. अनेकांवार विनाशुल्क उपचार केले गेले आहेत. देशात जागतिक स्तरावरील वैद्यकीय सुविधा सुरु करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे लक्ष्य आहे.
कोरोना व्हायरस हा एक अदृश्य शत्रू आहे. तो दिसत नाही मात्र कोरोना वॉरियर्सची मेहनत दिसत आहे. आरोग्य कर्मचारी एखाद्या सैनिकासारखे काम करत आहेत. ते देशासाठी ही लढाई लढत आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. भारताच्या डॉक्टरांकडे जगाच्या नजरा आहेत. टीबीला 2025 पर्यंत संपवण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
मेक इन इंडियाला प्रोत्साहन द्यायचे आहे. सरकारने हिंसेविरुद्धही मोठी पावले उचलली आहेत. मेक इन इंडियाअंतर्गत देशात पीपीई किट, एन-95 मास्क बनत आहेत. देशात आरोग्य सेतू ऍप बनवण्यात आलं असून आतापर्यंत 12 कोटी लोकांनी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केलं आहे.