नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याला हटवले नाहीतर आगामी काळात भारताला त्याची मोठी लष्करी किंमत मोजावी लागू शकते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. ते शुक्रवारी भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी माजी संरक्षणमंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी मोदी सरकारचा काही महत्त्वाचे सल्ले दिले.
निशस्त्र सैनिकांविषयी राहुल गांधींच्या मुद्दयाशी शरद पवारांची अप्रत्यक्ष असहमती
यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, भारताच्या डुरबोक-दौलत बेग ओल्डी या मार्गावर वचक ठेवण्यासाठी चीनला आपले सैन्य गलवान खोऱ्यात ठेवायचे आहे. जेणेकरून वेळ पडल्यास कधीही चिनी सैन्याला Dubruk-DBO Road मार्ग रोखून धरता येईल. तसे घडल्यास भारताला याची मोठी लष्करी किंमत मोजावी लागेल. तसेच हा मार्ग कारकोरम पास आणि सियाचीन ग्लेशिअरलाही जोडणारा आहे, असे पवारांनी सांगितले.
'सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद', चीनच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोदींना पाठिंबा
त्यामुळे चिनी सैन्याने गलवान खोऱ्याचा प्रदेश सोडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला काही कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, हा प्रश्न राजनैतिक आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर भर द्यावा, असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.