नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताकडून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या सगळ्या वातावरणामुळे पाकिस्तान युद्धाच्या तयारीला लागल्याचे समजते. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर इम्रान खान यांनीही आम्ही भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची गर्जना केली होती.
'द टाईम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, पाकिस्तान युद्धाच्या तयारीला लागल्याचे समजते. पाकिस्तानाच्या लष्करी अधिकाऱ्यांकडील कागदपत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. बलुचिस्तान येथील एका लष्करी तळावरील या कागदपत्रांमध्ये पाकिस्ताकडून स्थानिक पातळीवर जारी करण्यात आलेल्या आदेशांची माहिती आहे. यामध्ये क्वेटा येथील जिलानी रुग्णालयाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युद्ध झाल्यास वैद्यकीय उपचारांची व्यवस्था कशी असेल, यासंबंधी धोरण निश्चित करण्याच्या सूचनाही रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. पूर्वेकडील आघाडीवर अचानक युद्ध झाल्यास पाकिस्तानच्या जखमी सैनिकांना जिलानी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. लष्करी आणि स्थानिक रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असल्यास खासगी रुग्णालयांची मदत होऊ शकते. त्यामुळे या परिसरातील सर्व रुग्णालयांना २५ टक्के खाटा राखीव ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, पाकव्याप्त काश्मीरमध्ये येणाऱ्या नीलम, झेलम, रावलकोट, हवेली, कोटली आणि भीमबेर येथील लष्करी अधिकाऱ्यांनाही भारताकडून होणाऱ्या हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित रस्त्यांचा वापर करावा. रात्रीच्यावेळी गरज नसेल तेव्हा लाईटही बंद ठेवावेत, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानने यापूर्वीच सीमाभागातील दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी हलवल्याचे समजते.