'आता युरोपियन खासदार संसदेत येऊन मोदी सरकारची स्तुतीही करतील'

काँग्रेस पक्षाकडूनही युरोपियन खासदारांच्या काश्मीर दौऱ्यावर टीका करण्यात आली.

Updated: Oct 31, 2019, 10:35 AM IST
'आता युरोपियन खासदार संसदेत येऊन मोदी सरकारची स्तुतीही करतील' title=

नवी दिल्ली: युरोपियन महासंघाच्या खासदारांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावरून काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. या सर्वांना संसदेत बोलावून मोदी सरकारला त्यांच्या तोंडून स्वत:चे कौतुक करून घ्यायचे असेल, अशी शक्यता पी. चिदंबरम यांनी बोलून दाखवली. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात सध्या पी. चिदंबरम यांची अंमलबजावणी संचलनालय (ईडी ) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरु आहे. चिदंबरम यांना बुधवारी विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या सुनावणीपूर्वी चिदंबरम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. 

यावेळी त्यांना युरोपियन महासंघाच्या खासदारांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याविषयी विचारण्यात आले. यावेळी चिदंबरम यांनी खोचकपणे म्हटले की, युरोपियन महासंघाच्या खासदारांना भारतीय संसदेत बोलावेल जाऊ शकते. याठिकाणी ते मोदी सरकारच्या बाजूने बोलतील. काय माहिती, कदाचित असे घडू शकते, असे चिदंबरम यांनी म्हटले. 

जम्मू-काश्मीरमधून 'अनुच्छेद ३७०' रद्द झाल्यानंतर मलाला म्हणते...

तत्पूर्वी काँग्रेस पक्षाकडूनही युरोपियन खासदारांच्या काश्मीर दौऱ्यावर टीका करण्यात आली. हा दौरा म्हणजे देशाच्या इतिहासातील राजनैतिक घोडचूक आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, मोदी सरकार जाणीवपूर्वक काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करत असल्याची टीका काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली होती. 

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये अद्यापही तणावाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने काही अपवाद वगळता विरोधी पक्षाच्या नेत्यांना काश्मीरमध्ये जाण्यास मनाई केली आहे. मात्र, युरोपियन महासंघाच्या २३ खासदारांच्या शिष्टमंडळाने नुकतीच काश्मीरला भेट दिली. दरम्यान, केंद्राच्या निर्णयानंतर आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात आले आहेत.