अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्यात सुरू झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागलंय.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील जाहीर सभेत बोलताना आज अय्यर यांच्यावर गंभीर आरोप केले. अय्यर जेव्हा पाकिस्तानात गेले होते, तेव्हा त्यांनी मला हटवण्याची भाषा केली होती. मला रस्त्यातून हटवा, याचा अर्थ काय घ्यायचा? मला कोणत्या गुन्ह्यासाठी त्यांनी रस्त्यातून हटवायचंय? असे भावनिक सवाल मोदींनी गुजराती जनतेला उद्देशून केलेत.
पंतप्रधान मोदींना नीच म्हणणाऱ्या अय्यर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. माझ्या वक्तव्यामुळं काँग्रेसला नुकसान होत असेल तर माझ्यावर झालेली कारवाई योग्यच आहे, असं अय्यर म्हणाले.
तर काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अय्यर यांच्या निलंबनाचं समर्थन करताना मोदींना चिमटा काढला. काँग्रेस देशाच्या पंतप्रधानाचा आदर करतं. पण मोदीजी आमच्याबद्दल काहीही बोलू शकतात, असा टोला त्यांनी लगावला.