'सर मला मूळव्याध झालाय, सुट्टी हवी,' कर्मचाऱ्याच्या मेसेजवर मॅनेजर म्हणाला 'पुरावा दे', त्याने फोटो काढला अन्...

एखाद्या कर्मचाऱ्याने अचानक सुट्टी मागितल्यानंतर त्याच्या बॉसला शंका येणं यात तसं काही नवल नाही. पण पुरावा म्हणून थेट फोटो मागवणं हे अविश्वासाचं लक्षण आहे. दरम्यान एका प्रकरणात तर बॉसने कर्मचाऱ्याकडे थेट मूळव्याधचा पुरावा मागितला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 20, 2024, 06:25 PM IST
'सर मला मूळव्याध झालाय, सुट्टी हवी,' कर्मचाऱ्याच्या मेसेजवर मॅनेजर म्हणाला 'पुरावा दे', त्याने फोटो काढला अन्... title=

एखादं काम आल्याने, तब्ब्येत बिघडल्याने किंवा इतर कारणांमुळे अचानक कामावर सुट्टी टाकण्याची वेळ  कधी ना कधीतरी प्रत्येकावर येते. पण जर अशावेळी बॉसने पुरावा मागितला तर तो अविश्वास मन दुखावणारा असतो. त्यात जर मूळव्याध असेल तर हे कारण देत सुट्टी मागणं आधीच लाजिरवाणं असतं. त्यात उलट जर बॉस त्याचाच पुरावा मागत असेल तर मग काय बोलायचं अशी स्थिती असते. दरम्यान असाच एका आश्चर्यकारक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मूळव्याधचा त्रास होत असल्याने कर्मचाऱ्याने मॅनेजरकडे सुट्टी मागितली होती. पण यावेळी त्याच्या मॅनेजरने पुरावा मागितला. आता गोष्टी आधीच इतक्या विचित्र होत असताना कर्मचाऱ्याने त्यात थोडासा उपहासात्मकपणा जोडण्याचं ठरवलं. त्याने मॅनेजरला थेट आपल्या पार्श्वभागाचा फोटो पाठवला. 

Reddit वर त्याने हा किस्सा शेअर केला आहे. कामाच्या ठिकाणी होणारे त्रास यावर चर्चा सुरु असताना त्याने ही घटना सांगितली. “मला मूळव्याध आहे आणि मी जास्त वेळ उभा राहू शकत नसल्याने येऊ शकत नसल्याचं कळलं. मॅनेजर म्हणाला की मला त्याला पुरावा पाठवायचा आहे, म्हणून मी त्याला माझ्या मूळव्याधीचा एक फोटो पाठवला," असं कर्मचाऱ्याने सांगितल.

"आता, मी याचा विचार करत आहे. मला खात्री नाही की मी त्याला फोटो पाठवून कंपनीचे कोणतेही नियम किंवा कायदे तोडले आहेत की नाही (त्याने मागवलेले). जर त्याने एचआर किंवा पोलिसांना याबद्दल सांगितलं तर मला काही त्रास होईल का?", अशी विचारणाही त्याने केली आहे. 

या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. काहींनी त्याला मॅनेजरला चोख उत्तर दिल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी कदातिच तो डॉक्टरची नोट मागत असावा असं म्हटलं आहे. तर काहींनी आपल्या पार्श्वभागाचा फोटो पाठवणं यात हास्यास्पद काही नसल्याचं म्हटलं आहे. 

यावेळी अनेकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. एका युजरने सांगितलं की, “एकदा आजारी असल्याने फोन केला असता माझा बॉस सतत फोन, मेसेज करुन काय झालंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर मी माझा उघडा फोटो पाठवला. तसंच माझ्या बाथटबच्या बाजूला केलेल्या उलट्या, खराब झालेली दाढीचा फोटोही त्यात होता. ‘तुम्हाला टॉयलेट बघायला आवडेल का? असंही मी विचारलं होतं, त्यावर त्याने मला फटकारत हे अनावश्यक आणि घाणेरडं होतं असं सांगितलं".

एका युजरने स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की, त्याने आजारी वाटत असल्याने एक दिवसाची सुट्टी मागितली होती. प्रत्युत्तरात, मॅनेजरने, "आजारी रजा किंवा प्रासंगिक रजा घेण्यासाठी तुम्हाला किमान 7 दिवस आधी माहिती देणं आवश्यक आहे," असं सांगितलं होतं. “पुढील 7 दिवसात मी आजारी पडणार आहे हे कसे कळेल?,” असा युक्तिवाद यावर युजर्सनी केला.