Asaduddin Owaisi on Navneet Rana: अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांच्या एका विधानानुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला. "जर पोलिसांना 15 सेकंदासाठी हटवलं तर या भावांचा पत्ता लागणार नाही की कुठून आले आणि कुठून गेले," असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी हे विधान केलं. दरम्यान त्यांच्या या विधानावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला आहे.
11 वर्षांपूर्वी अकबरुद्धीन ओवेसी यांनी हिंदूंचा उल्लेख करत जर पोलिसांना 15 मिनिटं हटवा असं आव्हान दिलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद झाला होता. आता नवनीत राणा यांनी त्यांना आव्हान देत जुना वाद नव्याने समोर आणला आहे. नवनीत राणा हैदराबामध्ये भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी पोहोचल्या होत्या. या मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी यांचं वर्चस्व आहे.
"छोटा भाऊ म्हणतो की पोलिसांना 15 मिनिटं हटवा आम्ही काय करु शकतो हे दाखवून देतो. त्याला मला सांगायचं आहे की, तुला 15 मिनिटं लागतील पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. 15 सेकंदानंतर छोट्याला कुठून आलो आणि कुठे गेलो हे समजणार नाही," असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे. तसंच माधवी लता हैदराबादला पाकिस्तानात रुपांतरित होण्यापासून रोखतील असंही सांगितलं.
"जर तुम्ही एमआयएम आणि काँग्रेसला मत दिले तर ते थेट पाकिस्तानात जातं. पाकिस्तान ज्याप्रकारे 'एमआयएम प्रेम' आणि 'राहुलप्रेम' दाखवत आहे... ज्याप्रकारे काँग्रेसने पाकिस्तानच्या इशाऱ्यावर देशाचा कारभार चालवला... तोच पाक आज म्हणतोय की त्यांना काँग्रेस आणि एमआयएम आवडतात," असं नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणा यांच्या विधानावर असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिलं आहे. "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगत आहे की, त्यांना 15 सेकंद द्या. त्या काय करणार आहेत? त्यांना 15 सेकंद नको तर 1 तास द्या. त्या काय करु शकतात हे आम्हालाही पाहायचं आहे. त्यांच्यात काही माणुसकी उरली आहे का? कोण घाबरलं आहे? आम्ही तयार आहोत. जर कोणी असं जाहीर आव्हान देत असेल तर देऊ देत. कोण त्यांना थांबवत आहे?".
एमआयएम नेते वारिस पठाण यांनीही नवनीत राणा यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून, त्या निवडणुकीत पराभूत होणार हे आता स्पष्ट दिसत असल्याचं म्हटलं आहे. तसंच पोलीस आणि निवडणूक आयोगाने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"नवनीत राणा यांना आता आपला पराभव होणार हे समजलं आहे. त्यांना धक्का बसल्याने त्या अशी विधानं करत आहेत. पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडून कारवाई का केली जात नाही? त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोप वारिस पठाण यांनी केला आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी भाजपावर समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. हे लोक समाजात विष मिसळत आहेत. भाजपाचे सर्व नेते निवडणुकीत हेच करत आहेत असं ते म्हणाले आहेत.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्र आहेत, त्यापैकी सहा एमआयएमकडे आहेत. तेलंगणातील लोकसभेच्या इतर 16 जागांसह 13 मे रोजी मतदान होत आहे.