Live-in Relationships : देशात पुन्हा एकदा लिव्ह-इन रिलेशनशीपचा मुद्दा पेटला आहे. लिव्ह-इन रिलेशन म्हणजे वयात आलेला मुलगा आणि मुलगी लग्न न करता पती-पत्नीप्रमाणे एकाच घरात राहतात. यात दोघांमध्ये मानसिक आणि भावनिक नात्यासोबतच शारीरिक संबंधही प्रस्थापित होतात. भारतीय समाजात या गोष्टीला मान्यता नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2014 मध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता आणि संरक्षण दिले आहे. काही महिन्यांपूर्वी देशाला हादरवून सोडणाऱ्य़ा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं (Shradha Walkar Murder Case) लिव्ह-इनचा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणाती आरीप आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर लिव्ह-इनमध्ये राहात होते. दोघांमध्ये भांडण झालं आणि आफताबने तीची निर्घृण हत्या केली. श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करत त्याने ते जंगलात फेकून दिले. या प्रकरणानंतरही लिव्ह-इनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला आहे. भाजप खासदार धर्मबीर सिंह (BJP MP Dharmabir Singh) यांनी लिव्ह-इन हा एक आजार असल्याचं सांगत याविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा दाखला दिला. पण याबाबत सामान्य नागरिकांमध्ये दुमत आहे. वयात आलेली मुलं हा त्यांच्या निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं काही लोकांचं मत आहे.
खासदाराने काय म्हटलंय?
हरियाणाचे खासदार धर्मबीर सिंह यांनी लोकसभेत लिव्ह-इनचा मुद्दा उपस्थित करत हा एक गंभीर आणि ज्वलंत विषय असल्याचं म्हटलं. संपूर्ण जगात भारतीय संस्कृती ही बंधुत्व आणि 'वसुधैव कुटुंबकम' साठी ओळखले जाते. भारतीयांचं राहणीमान जगातील इतर देशांपेक्षा वेगळं आहे. जगभरातील लोक भारतीय संस्कृतीच्या 'विविधतेतील एकतेचं' कौतुक करतात. भारतीय समाजात शतकानुशतके पालकांनी ठरवलेल्या विवाह पद्धतीला पसंत करतात. आजही, देशातील एक मोठा वर्ग त्यांच्या पालकांनी किंवा कुटुंबातील सदस्यांनी आयोजित केलेल्या विवाहांना प्राधान्य देतो. यामध्ये वधू-वरांची संमतीही आवश्यक असते असं धर्मबीर सिंह यांनी सांगितलं.
सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये आणि सर्वांची पसंती इत्यादी अनेक गोष्टी लक्षात घेऊन ठरवलेले विवाह आयोजित केले जातात. यात कौटुंबिक पार्श्वभूमीलाही प्राधान्य दिलं जातं. भारतात, विवाह हे एक पवित्र बंधन मानलं जातं ज्यात सात पिढ्यांपर्यंत साथ देण्याची शपथ घेतली जाते. शिवाय घटस्फोटाचं प्रमाणही खूपच कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अलिकडच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढत चाललं आहे, याला मुख्य कारण आहे प्रेमविवाह. प्रेमविवाह करताना मुलगा आणि मुलीच्या पालंकाची संमती अनिवार्य करावी अशी सूचना धर्मबीर सिंह यांनी केली. भारतात अनेक भागात, एकाच गोत्रात किंवा एकाच गावात विवाह होत नाहीत. प्रेमविवाहामुळे गावात अनेक भांडणे होतात आणि संपूर्ण कुटुंबे नष्ट होतात, त्यामुळे दोन्ही कुटुंबांची संमती आवश्यक असल्याचं धर्मबीर यांनी सांगितलं.
लिव्ह-इन आजार आहे का?
इतकंच नाही तर धर्मबीर सिंह यांनी लिव्ह-इन हा एक आजार असल्याचं म्हटलंय. हा आजार पश्चिमी देशातून आपल्या देशात आलाय. याचे परिणाम भयानक आहे. श्रद्धा-आफाताबचं प्रकरण याचाच एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशी अनेक प्रकरणं दररोज समोर येत आहेत. यामुळे भारतीय संस्कृतीला धोका आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. परिस्तिती अशीच राहिलीतर एकेदिवशी भारतीय संस्कृतीच नष्ट होईल अशी भीती व्यक्त करत लिव्ह-इन रिलेशनशिपविरोधात कायदा बनवण्याची मागणी धर्मबीर सिंग यांनी केली.