Kolkata Crime: एखाद्या चोरीच्या घटनेत पुन्हा ती वस्तू मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. चोर सापडतात, त्यांच्यावर खटला चालतो पण त्या वस्तूची त्यांनी मोडतोड केलली असते. अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण 21 वर्षांपुर्वी झालेल्या चोरीच्या घटनेचा आता निकाल आला आहे. या घटनेत 15 कोटी किंमतीचा हिरा चोरीस गेला होता. जो आता चोराच्या घरी विजेच्या मीटरमध्ये सापडला आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
15 कोटींच्या हिरा चोरीप्रकरणी कोलकाता जिल्हा न्यायालयात 21 वर्षे एक खटला सुरू होता. आता 21 वर्षांनी पोलिसांनी ही केस मिटवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोराला पकडले होते पण हिरा काही त्यांना मिळाला नव्हता. आता 21 वर्षांनंतर ज्या नाट्यमय पद्धतीने हा हिरा सापडला, ते पाहून न्यायाधीशांनाही यावर प्रतिक्रिया देण्यापासून रोखता आले नाही. हिरा परत करत त्यांनी संपूर्ण घटनेची तुलना सत्यजित रे यांच्या फेलुदा क्लासिक चित्रपट 'जॉय बाबा फेलुनाथ'शी केली. या चित्रपटात आरोपीने दुर्गामातेच्या मूर्तीतील सिंहाच्या आत किमती वस्तू लपवून ठेवली होती.
कोलकाता येथील दरोड्याच्या या घटनेत आरोपीने घरातील जिन्याखाली मीटरमध्ये हिरा लपवून ठेवला होता. ही घटना 2002 साली दक्षिण कोलकाता येथे घडली होती. त्याचे मालक प्रणव कुमार रॉय यांना 32 कॅरेटचा गोलकोंडा डायमंड विकायचा होता, ज्यासाठी ते खरेदीदार शोधत होते. त्याच वर्षी जूनमध्ये हिरे दलाल इंद्रजीत तापडिया हे त्यांच्याकडे व्यक्तीला घेऊन पोहोचले. दोघेही ज्या पद्धतीने हिऱ्याकडे पाहत होते, त्यामुळे मला संशय आल्याचे रॉय यांनी सांगितले. म्हणून रॉय यांनी त्यांना हिरा परत करण्यास सांगितले.
इंद्रजीतने ताबडतोब बंदूक काढली आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला हिरा दिला. रॉय यांची इंद्रजीतसोबत झटापटी झाली. आरोपींसोबत असलेल्या व्यक्तीने रॉय यांना जमिनीवर पाडले, त्यानंतर दोघेही पळून गेले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले होते. असे असले तरी त्यांच्याकडून हिरा जप्त करण्यात आला नव्हता. अनेक वेळा पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हिरा आरोपीच्या घरात असल्याचे माहिती होते पण त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.
21 वर्षांच्या तपास आणि कोर्ट केसनंतर पुन्हा एकदा पोलिसांनी आरोपीच्या घराची चौकशी केली. यावेळी वेगळ्या पॅटर्नने शोध घेण्याचे ठरले, त्यात हा हिरा घराच्या जिन्याखाली वीज मीटरमध्ये सापडला. यानंतर न्यायाधीश आनंद शंकर मुखोपाध्याय यांनी संपूर्ण प्रकरणाची सत्यजित रे यांच्या 'जॉय बाबा फेलुनाथ' चित्रपटाशी तुलना करत व्यापाऱ्याला हिरा परत केला.