नवी दिल्ली : सलील एस पारेख यांची इन्फोसिसच्या सीइओ आणि एमडी पदी नेमणूक झाली आहे.
सलील एस पारेख हे, "केपजेमिनी" या फ्रेंच आयटी सर्व्हिसेस कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनियरींगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. ते आयआयटीचे एरोनॉटीकल इंजिनियरींगचे पदवीधर आहेत.
इन्फोसिसचे विद्यमान चेअरमन, नंदन निलेकणी यांनी यावर आनंद व्यक्त केलाय.सलील हे गेल्या तीन दशकांपासून जागतिक पातळीवर आयटी उद्योगात कार्यरत आहेत. या क्षेत्रात त्यांचा उत्तम अनुभव असून, अनेक कामगिऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत, असंही नंदन निलेकणी यांनी म्हटलंय.
इन्फोसिसचं मुख्यालय बेंगालुरू इथं आहेत. ऑगस्ट महिन्यात विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. संचालक मंडळ आणि कंपनीचे संस्थापक यांच्यात झालेल्या प्रदीर्घ लढाईनंतर सिक्का इन्फोसिसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर नंदन निलेकणी यांना इन्फोसिसमध्ये परतावं लागलं होतं. ते इन्फोसिसच्या सात संस्थापकापैकी एक आहेत. सिक्का बाहेर पडल्यानंतर इन्फोसिस नवीन सीइओच्या शोधात होती.