Tobacco businessman KK Mishra: कानपूरमधल्या बंशीधर तंबाखू कंपनीचा मालक केक मिश्राच्या (KK Mishra) घरी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे (Income Tax Raid) टाकले. तब्बल पाच दिवस ही छापेमारी सुरु होती. मिश्राची संपत्ती पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. केके मिश्राने आपल्या कंपनीचा टर्नओव्हर 20 करोड इतका दाखवला होता. पण या व्यापाराच्या घरात सापडल्या महागड्या वस्तू पाहून हा व्यापारी खोटे आकडे सांगत असल्याचं निष्पन्न झालं. या व्यापाऱ्याच्या घरात लक्झरी कार, महागडी घड्याळं, ऐशोआरामाची अनेक साधनं आढळून आली. आयकर विभागाच्या छाप्यात तंबाकू कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 200 कोटी असल्याचं समोर आलं.
बंशीधर तंबाखू कंपनीच्या कानपूर, दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात 5 कोटींची रोख रक्कम, 2.5 कोटींचे दागिने, 6 कोटींची महागडी घड्याळं आणि 60 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केके मिश्राच्या दिल्लीतल्या घरावर छापा टाकला त्यावेळी त्याच्या मुलाने या अधिकाऱ्यांवर पिस्तूल ताणली. पण या अधिकाऱ्यांनी ओळख दिल्यानंतर तो शांत झाला.
आपल्या घरी दरोडा टाकण्यासाठी आल्याचं वाटल्याने पिस्तूल ताणली असं केके मिश्राचा मुलगा शिवम मिश्राने सांगितलं. या छाप्यात घरातील नोकरांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी आयकर विभागाचे अधिकारी हैराण झाले. घरातील स्वयंपाकी आणि केअरटेकरसह अनेक नोकरांकडे चक्क आयफोनचे नवीन फोन आढळले. नोकरांचं राहाणीमानही उच्चदर्जाचं होतं. यावरुन तंबाखू किंग मिश्राकडे किती संपत्ती असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
तंबाखू व्यापारी केके मिश्राची गुजरातमधल्या एका गावात फॅक्टरी आहे. तिथे राहाण्यासाठी मिश्राने अलिशान बंगला बनवला आहे. यात लाखो लीटर पाण्याची क्षमता असलेला स्विमिंग पूल आहे. विशेष म्हणजे ज्या भागात हा बंगला आहे. त्या गावत पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे मिश्राच्या बंगल्यातील स्विमिंग पूलसाठी पाणी कुठून येतं हा प्रश्न उपस्थित होतो. स्विमिंग पूलसाठी पाणी वापरला तिथल्या प्रशासनाने परवानगी दिली आहे का याची आयकर विभाग चौकशी करत आहे.
बंशीधर तंबाखू कंपनीचा मालक केके मिश्राचा मुलगा शिवम मिश्राकडे लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. यात लॅम्बोर्गिनी, फेरारी, रोल्स रॉयस सारख्या करोडो रुपयांच्या गाड्यांचा समावेश आहे. दिल्लीतल्या त्यांच्या अलिशान बंगल्यातून रोल्स रॉयस फँटम कार जप्त करण्यात आली आहे. शिव दुबेकडे असलेल्या सर्व गाड्यांचा नंबर 4018 असा कॉमन आहे. अलिशान कारच्या या ताफ्यात एक जुनी प्रिया स्कूटरही सापडली आहे. ज्याचा नंबरही 4018 असा आहे. मिश्रा कुटुंब ही स्कूटर लकी असल्याचं मानतं. गाड्यांचा नंबर आपल्यासाठी शुभ असल्याचं मिश्राने सांगितलं.
तंबाखू किंग केके मिश्रावर टॅक्स चोरीचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. कानपूरमधील नयागंज इथली बंशीधर एक्सपोर्ट आणि बंशीधर टोबॅको कंपनी अरबो रुपयांच्या तंबाखूची विक्रम करत होती. पण याची कुठेच नोंद ठेवली जात नव्हती. आयकर विभागाला जवळपास 50 कोटी रुपायंच्या खरेदी-विक्रीची कच्ची नोंद सापडली आहे. अशीच कच्ची कागदपत्र दिल्ली आणि अहमदाबादमधूनही जप्त करण्यात आली आहेत.