तामिळनाडूत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

तामिळनाडूतील चेन्नई आणि आसपासच्या परिसरात गेल्या दहा तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 3, 2017, 03:27 PM IST
तामिळनाडूत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत title=
Image: ANI

चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नई आणि आसपासच्या परिसरात गेल्या दहा तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुसळधार पावसामुळे चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून या परिसरातील शाळा, महाविद्यालय बंद आहेत.

हवामान विभागाने तामिळनाडूतील उत्तर भागात मुसळधार पावसाचा इशारा गुरुवारी दिला होता. हवामान खात्याच्या माहितीनुसार, श्रीलंका आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

हवामान खात्याने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, "तामिळनाडुतील चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम या ठिकाणी पाऊस सुरुच राहणार आहे. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिमी मांबलम आणि गुइंडी इंडस्ट्रीयल एस्टेट परिसरात पाणी साचले होते.

पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पाणी साचल्याने बस, टॅक्सी, रिक्षा आणि उपनगरीय ट्रेन सेवेवर परिणाम झाला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी साचल्यामुळे सेंट थॉमस माऊंट आणि कोडम्बक्कम उपनगर सेक्टरमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.