मुंबई : गगनाला भिडणाऱ्या सोन्या- चांदीच्या दरांचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच वायदा बाजारात या मौल्यवान धातूंचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या किंमती चर्चेचा विषय ठरत आहेत.
बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याचे दर २२५ रुपयांनी कमी झाले. परिणामी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ५०४५६ रुपयांवर पोहोचले. तर, चांदी १३६६ रुपयांनी उतरली. ज्यामुळं प्रति किलो चांदीचे दर ६११०० इतके असल्याचं पाहिलं गेलं.
मंगळवारी या दरांनी काहीशी उंची गाठली होती. ज्यामुळं सोन्याचे दर प्रतितोळा ५१ हजारांपलीकडे पोहोचले होते. दिल्लीतील सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे ६६३ रुपयांनी वाढले होते. तर चांदीच्या दरांत १३२१ रुपयांनी वाढ झाली होती.
येत्या दिवसांत सोन्या- चांदीचे दर उतरणार....
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये सोन्या- चांदीच्या दरांत सातत्यपूर्ण घसरण पाहिली जाणार आहे. सोन्याच्या दरांमध्ये होणारी ही घट पाहता येत्या दिवसांमध्ये हे दर प्रतितोळा ४८ हजारांपर्यंत उतरु शकतात. दिवाळीच्या दिवसांमध्ये मात्र सोनं पुन्हा महागण्याची चिन्हं आहेत. तर, डिसेंबरच्या अखेरीस सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला असेल.