वाड्रा असोत की मोदी, भ्रष्टाचारप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी : राहुल गांधी

 कायदा सर्वांसाठी समान असावा, मोदी असोत की वाड्रा भ्रष्टाचारप्रकऱणी सर्वांची चौकशी व्हावी, असे  राहुल गांधी यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.  

ANI | Updated: Mar 13, 2019, 06:57 PM IST
वाड्रा असोत की मोदी, भ्रष्टाचारप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी : राहुल गांधी title=

नवी दिल्ली : कायदा सर्वांसाठी समान असावा, मोदी असोत की वाड्रा भ्रष्टाचारप्रकऱणी सर्वांची चौकशी व्हावी, असे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. चैन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी राफेल व्यवहाराबाबत मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राफेल व्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समांतर वाटाघाटी केल्याचा स्पष्ट उल्लेख कागदपत्रांमध्ये आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. मोदी असो की वाड्रा प्रत्येकाच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे. सरकारने तो केवळ ठराविक लोकांवर लागू करू नये. मग रॉबर्ट वाड्रा असो की नरेंद्र मोदी प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केले.

चैन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी त्यांना रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला. तेव्हा कायदा सर्वांना समान असायला हवा. केवळ ठराविक लोकांसाठी कायदा लागू केला जाऊ नये. कायद्यानुसार वॉड्राप्रमाणेच मोदींचीही राफेल घोटाळ्याप्रकरणी चौकशी व्हायला हवी, हे सांगताना अशी भूमिका मांडणारा मी पहिलाच आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी पुन्हा राफेल घोटाळ्यावरून भाजपवर टीका केली. 

यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात येईल, असे स्पष्ट केले. आम्ही महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणार आहोत. महिलांकडे खूप कमी प्रमाणात नेतृत्व आहे. जोपर्यंत स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलत नाही, तोपर्यंत त्या सत्तेच्या केंद्रस्थानी दिसणार नाहीत, असेही ते म्हणालेत.