Goa Coronavirus Update : (December) डिसेंबर महिना उजाडला की, सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे आणि मनाचा ठाव घेणाऱ्या एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचे. यामध्ये काही ठिकाणांना अनेकांचीच पसंती असते. तिथं असणारं स्वातंत्र्य आणि त्यातही तिथला एकंदर माहोल यामुळं या ठिकाणांना वारंवार भेट देण्यासाठीसुद्धा बरेचजण तयार असतात. असंच एक ठिकाण म्हणजे गोवा. सध्याच्या घडीला ख्रिसमस (Christmas) आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला थर्टीफर्स्ट (31 December) पाहता गोव्यात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचं पाहायला मिळत आहे.
एकिकडे गोव्याच्या (Goa Tourists) दिशेनं जाणाऱ्यांची पावलं वाढत असतानाच दुसरीकडे कोरोनानं डोकं वर काढल्यामुळं चिंता वाढली आहे. सुट्टीच्या दजिवसांमध्ये आणि वर्षभरही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा आकडा तुलनेनं जास्त असतो. त्यातही परदेशी पर्यटकांची इथं तोबा गर्दी पाहायला मिळते. त्यामुळं आता कोरोना (Corona) फोफोवत असताना गोव्यात नवे नियम लागू होतात का, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करु लागला. ज्याचं उत्तर खुद्द गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीच देत सर्वकाही स्पष्ट केलं.
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी गोव्यात बिनधास्त सेलिब्रेशन करता येणार आहे असंच आता कळत आहे. 'कोरोनाबाबत सरकार अलर्ट आहे, पण गोव्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतील', अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. 2% आंतरराष्ट्रीय पर्यटकांची जिनोम सिक्वेन्सिंग टेस्टिंग केली जाणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
गोव्यात कोणत्या भागांमध्ये प्रचंड गर्दी?
पर्यटकांच्या विशलिस्टमध्ये असणारा गोवा, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं खुललेला दिसतो. गोव्यात येणाऱ्यांकडूनही इथल्या ठराविक भागांना प्राधान्य दिलं जातं. कसिनो आणि पार्टी, पब कल्चरसाठी इथं नॉर्थ गोवा अर्थात गोव्याच्या उत्तर भागात येणाऱ्यांची मोठी संख्या आहे (North Goa).
निर्मनुष्य समुद्र किनारे, शांतता, एकांत आणि आजुबाजूला काय सुरुये याची कोणालाही फिकीर नसेल असं वातावरण हवं असणारी मंडळी साऊथ गोवा म्हणजेच गोव्याच्या दक्षिण भागाला पसंती देतात (South Goa ). इथंच पालोलिम (Palolem), अगोंडा (Agonda) या किनारपट्टी भागात परदेशी नागरिकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते.
गोव्यात हॉटेल, होम स्टे हाऊसफुल्ल (Goa hotels and homestays)
वर्षअखेर आणि सुट्ट्यांचा माहोल पाहता गोव्यात सध्या गर्दी वाढतच चालली आहे. इथं राहण्याची सोय असणारे महागातले महाग आणि स्वस्तास ही सर्व व्यवस्था करुन देणारे हॉटेल, होम स्टे हाऊसफुल्ल झाले आहे. खाण्यापिण्यासाठीच्या ठिकाणांवरही प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. थोडक्यात कोरोनाची तसुभरही भीती गोव्यापर्यंत पोहोचलेली नाही. असं असलं तरीही तुम्ही तिथं जाण्याचा बेत आखत असाल, तर आपआपल्या परीनं सावधगिरी बाळगणं हाच उत्तम पर्याय असेल (Goa Reastaurants).