LokSabha Election: 'माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,' काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला 'भाजपात...'

LokSabha Election: काँग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Apr 9, 2024, 03:28 PM IST
LokSabha Election: 'माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,' काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला 'भाजपात...' title=

LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना काँग्रेस नेते आणि आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी मोठं विधान केलं आहे. ए के अँटनी यांनी आपल्या मुलाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे असं म्हटलं आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत. इंडिया आघाडी पुढे जात असून, भाजपा आता खाली जात आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी आहे. आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात सतत लढत आहे असं ए के अँटनी म्हणाले आहेत. 

अनिल अँटनी दक्षिण केरळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने एंटो अँटनी यांना उमेदवारी दिली आहे. ए के अँटनी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, "माझ्या मुलाच्या पक्षाचा पराभव झाला पाहिजे. त्याच्याविरोधात उभे असणारे काँग्रेस उमेदवार अँटो अँटनी विजयी व्हायला हवेत". यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या मुलांनी भाजपात प्रवेश करणं चुकीचं असल्याचं सांगितलं. 

काँग्रेस पक्षाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवण्याची भूमिका घेताना पत्रकार परिषदेत ए के अँटनी यांनी सांगितलं की, "आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात सतत लढत आहे".

त्यांना मुलाच्या राजकारणाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "काँग्रेस माझा धर्म आहे. काँग्रेसच्या मुलांनी भाजपात प्रवेश करणं आणि पळून जाणं चुकीचं आहे. जिथपर्यंत माझा प्रश्न आहे माझ्या राजकीय करिअरच्या सुरुवातीपासून मी कुटुंब आणि राजकारण वेगळं ठेवलं आहे".

काँग्रेस पक्ष राष्ट्रीय मुद्दे गांभीर्याने घेत नसल्याच्या केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी सतत नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसविरोधात लढा देत आहे. मला वाटत नाही की, केरळमधील लोक मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आरोपांना गांभीर्याने घेतील". भाजप आणि काँग्रेस केंद्रीय एजन्सी वापरण्यासाठी आणि केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डाला लक्ष्य करण्यासाठी एकत्र काम करत असल्याचा आरोपही विजयन यांनी केला.

"सर्व 20 जागांवर काँग्रेस आघाडीचा विजय होईल असं चित्र दिसत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सबरीमला मुद्द्यामुळे भाजपाला जास्त मतं मिळाली होती. या सर्व जागांवर त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होईल. सर्व जागांवर ते तिसऱ्या स्थानी राहतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.