निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारी 2024) अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. पण त्याआधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अर्थात आयएमएफनं पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल सकारात्मक अभिप्राय नोंदवलाय. चालू आर्थिक वर्षात जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान अर्थव्यवस्था असेल असं आयएमएफने म्हटलंय.
सोमवारी आयएमएफनं जारी केलेल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदाराचा अंदाज 6.5 टक्क्यांवरुन वाढवून 6.7 टक्के केलायसरकाराने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणूकीचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेच्या विकासदरावर होत असल्याचं आयएमएफने म्हटलंय. दुसऱ्या क्रमांकवरील चीनचा आर्थिक विकासाचा दर 5.2 टक्के राहील असंही आयएमएफनं म्हटलयं.
शिवाय अमेरिकेचा विकासदर अडीच टक्क्यांच्या आसपास तर रशिया, ब्राझिलचा विकासदर ३ टक्क्यांच्या आसपास राहील असं आयएमएफच्या अहवालात नमूद करण्यात आलाय. परिणामी वर्षाच्या सुरुवातीला व्यक्त करण्यात आलेला जीडीपीच्या विकासदराचा अंदाज वाढवल्याचही आयएमएफनं स्पष्ट केलंयवर्षाच्या सुरुवातीला आयएमएफनं भारताचा विकासदर 6 टक्के राहील असा आयएमएफचा अंदाज होता. दरम्यान सरकारने चालू आर्थिक वर्षात विकासदर 7.3 टक्के राहील असा अंदाज वर्तवलाय.
दरम्यान, विकसीत आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील मध्यवर्ती बँकांनी (RBI) व्याजाचे दर कमी करण्याचा निर्णय घेताना सावधगिरी बाळागावी असा सल्लाही आयएमएफने दिला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी तूर्त व्याजदर कपातीचा कोणताही विचार नसल्याचं 15 जानेवारीला दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या मंचावर सांगितलं आहे.
यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा...
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील यंदाचा शेवटचा अर्थसंकल्प असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. निवडणुका आणि त्यानंतर निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन सरकार स्थापन झाल्यानंतर सविस्तर अर्थसंकल्प आणि भविष्यासाठीच्या आर्थिक तरतुदींची विस्तृत घोषणा करण्यात येईल. असं असलं तरीही अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकार नेमकी कोणती मोठी घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार का, देशात महागाई वाढणार की कमी होणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही तासांत म्हणजेच अर्थसंकल्प जाहीर होताच मिळणार आहेत.