Aam Aadmi Party on Swati Maliwal: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांच्यासह गैरवर्तवणूक झाल्याचं मान्य केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या घटनेची दखल घेतली असून योग्य कारवाई केली जाईल असं सांगितलं असल्याची माहितीही पक्षाने दिली आहे. अरविंद केजरीवाल वैयक्तिक सचिव बिभव कुमार यांच्यावर कारवाई करतील असं सांगण्यात आलं आहे.
स्वाती मलिवाल दिल्लीमधील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार त्यांनी केली. याआधी स्वाती मलिवाल यांनी पीसीआर कॉलही केले होते. स्वाती मलिवाल यांनी दोन पीसीआर केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पण प्रोटोकॉलमुळे ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊ शकत नव्हते.
या घटनेनंतर आमद आदमी पक्षाने अधिकृतरित्या यावर भाष्य केलं असून स्वाती मलिवाल यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, "काल एक निंदनीय घटना घडली आहे. स्वाती मलिवाल अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेटायला गेल्या होत्या. त्या ड्रॉईंग रूममध्ये त्यांना भेटण्यासाठी थांबल्या असताना बिभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं. ही अत्यंत निंदनीय घटना आहे. अरविंद केजरीवाल यांनी दखल घेतली असून, कठोर कारवाई केली जाईल”.
संजय सिंग यांनी ही दुर्देवी घटना असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, "संजय मलिवाल यांनी देश आणि समाजासाठी मोठं काम केलं आहे. स्वाती मलिवाल पक्षाच्या जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांपैकी आहेत. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत".
दरम्यान भाजपाने या मुद्द्यावरुन गोंधळ घातला असून, अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय सिंह यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना दिल्ली भाजपाचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी आरोप केला की, राजकीय दबावामुळे स्वाती मालीवाल यांना गप्प केले जात असून संपूर्ण घटना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात एका महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले आणि तुम्ही म्हणत आहात की, त्याची दखल घेतली जाईल. यावरून 'आप' असंवेदनशील आहे हेच दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महिलेसोबत असा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? 26 तास उलटूनही पोलीस कारवाई करण्याबाबत बोलत नाहीत आणि राजकीय दबावापोटी संपूर्ण घटना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं वीरेंद्र सचेदवा म्हणाले आहेत.