'आतापासूनच असा वागतोय तर...', नवरीमुलीच्या आईने नवरदेवासह अख्खी वरात हॉलमधून मागे पाठवली; कारण वाचून कराल कौतुक

Viral Video: बंगळुरुत एका महिलेने थेट हॉलमध्येच आपल्या मुलीचं लग्न मोडलं. लग्नाचे विधी सुरु होण्याआधीच तिने हात तोडून नवरदेवासह संपूर्ण वरातीला निघून जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 14, 2025, 04:51 PM IST
'आतापासूनच असा वागतोय तर...', नवरीमुलीच्या आईने नवरदेवासह अख्खी वरात हॉलमधून मागे पाठवली; कारण वाचून कराल कौतुक  title=

Viral Video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे. लग्न हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून, त्यानंतर संपूर्ण आयुष्यच वेगळं वळण घेतं. यामुळे हा क्षण कायमचा लक्षात राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळेच लग्न थाटामाटाच करत हा आनंद साजरा केला जातो. पण अनेकदा हा आनंद साजरा करताना पातळी ओलांडली जाते. त्यात नवरदेवाची बाजू असेल तर आपण काही केलं तरी चालेल असा काहींचा समज असतो. पण बंगळुरुत नवरीमुलीच्या आईने अख्खी वरात मागे पाठवत नवरदेवासह त्याच्या मित्र, कुटुंबाला धडा शिकवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

लग्नाच्या मंडपात विधी सुरु होण्याच्या काही क्षण आधी नवरदेव आणि त्याचे मित्र दारुच्या नशेत पोहोचले होते. यावेळी त्यांनी मंडपातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे नवरीमुलीच्या आईने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हॉलमधून अख्खी वरात मागे पाठवली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी महिलेने दाखवलेल्या धैर्याचं कौतुक करत आहेत. सामाजिक दबावाला बळी न पडता आपल्या मुलीच्या भविष्याला महत्त्व दिल्याबद्दल नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. 

नवरदेव आणि त्याचे मित्र दारुच्या नशेत हॉलमध्ये पोहोचल्यानंतर नवरीमुलीची आई स्टेजवर पोहोचली. 'आतापासून त्याची ही वृत्ती आहे' अशा शब्दांत त्या आपला संताप व्यक्त करतात. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी खूप दारु प्यायली होती. यामुळे त्यांनी एकच गोंधळ घातला. एका क्षणी तर मद्यावस्थेत असणाऱ्या नवरदेवाने आरतीचं ताट खाली फेकून दिलं होतं. 

हे सर्व पाहिल्यानंतर संतापलेल्या नवरीमुलीच्या आईने स्टेजचा ताबा घेतला आणि त्यांना तुम्ही निघून जा असं सांगून टाकलं. व्हिडीओत त्या हात जोडून त्यांनी विनंतीवजा इशारा देत असल्याचं दिसत आहे. "आतापासूनत ही वृत्ती आहे. मग पुढे माझ्या मुलीचं भविष्य काय असेल?," असा संताप त्या व्यक्त करतात. पुढे म्हणतात, "तू माझ्या मुलीशी लग्न करावंस अशी इच्छा नाही. आम्हाला तू आमच्या कुटुंबात नको आहेस".

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून महिलेचं कौतुक होत आहे. "जर इतक्या विशेष दिवशी पुरुष स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर मग पूर्ण आयुष्यभरही राहणार नाही," अशी कमेंट एकाने केली आहे. तिने मुलीला एका मद्यप्रेमीपासून वाचवलं आहे असं एक नेटकरी म्हणाला आहे. 

एका युजरने लिहिलं आहे की, 'हा व्हिडीओ पाहून मला इतकं समाधान मिळालं आहे. पालक लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या मुलीच्या भवितव्याला प्राधान्य देत आहेत हे पाहून आनंद झाला'. लग्न ठरल्यानंतर ते मोडताना आर्थिक आणि सामाजिक दबाव असतानाही ते दाखवण्याची हिंमत दाखवली याचं विशेष कौतुक अशी कमेंट एकाने केली आहे.