Rs 26866 Crore Investment In February: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स फारच लोकप्रिय होताना दिसत आहे. मागील काही काळापासून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तर इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा मागील 23 महिन्यांचा विक्रम भारतीयांनी मोडीत काढला आहे. भारतीयांनी फेब्रुवारी 2024 मध्ये म्हणजेच 29 दिवसांमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये तब्बल 26 हजार 866 कोटींची गुंतवणूक केली आहे. मागील जवळपास 2 वर्षांमधील ही मासिक स्तरावरील इक्विटी म्युच्युअल फंडातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे.
थिमॅटीक फंडांमधील गुंतवणूकदरांना मोठा रस असल्याचं दिसत आहे. तसेच न्यू फंड ऑफरिंग्स म्हणजेच एनएफओंमुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक वाढली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जानेवारी महिन्यात 21 हजार 780 कोटींची गुंतवणूक भारतीयांनी केली होती. फेब्रवारी महिन्यामध्ये यात 23 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांच्या नियामक असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया म्हणजेच 'एम्फी'ने (AMFI) शुक्रवारी यासंदर्भातील आकडेवारी जारी केली. त्यानुसार मासिक सिस्टमॅटीक इनव्हेसमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये 18 हजार 838 कोटींची गुंतवणूक झाली. फेब्रुवारीमध्ये एसआयपीच्या माध्यमातून झालेल्या गुंतवणुकीने जानेवारीच्या या गुंतवणुकीच्या आकडेवारीला मागे टाकत तब्बल 19 हजार 186 कोटींचा टप्पा गाठला. ही सुद्धा एका विक्रमी आकडेवारी आहे हे विशेष.
'एम्फी'चे प्रमुख कार्यकारी अधिकारी वेंकट चलसानी यांनी, 'फेब्रुवारी 2024 मध्ये एसआयपी अंतर्गत 49.79 लाख नव्या खातेदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता एकूण एसआयपी खात्यांची संख्या 8.20 कोटींवर पोहोचली आहे. यामधून नियोजनपूर्वक गुंतवणुकीवर असलेला लोकांचा विश्वास अधोरेखित होत आहे,' असं मत नोंदवलं.
म्युच्युअल फंड क्षेत्राने फेब्रुवारी महिन्यामध्ये 1.2 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचं पाहायला मिळालं. जानेवारीच्या आकडेवारीच्या आसपासच ही आकडेवारी आहे. यामध्ये डेट ओरिएंटेड स्कीममधून 63 हजार 809 कोटी, इक्विटी योजनांमधून 26 हजार 866 कोटी आणि हायब्रीड योजनांमधून 18 हजार 105 कोटी रुपये गुंतवण्यात आले.
म्युच्युअल फंड ही एकत्रित गुंतवणूक असते. यामध्ये ज्यांना गुंतवणुकीत सारखीच/समान जोखीम घ्यावयाची आहे असे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या एका विशिष्ट योजनेत गुंतवणूक करतात. अशी एकत्रितपणे गुंतविलेली रक्कम संबंधित म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूकदारांची जेवढी जोखीम घ्यायची तयारी असेल त्यानुसार गुंतविली जाते. यासाठी प्रामुख्याने डेट फंड, बॅलन्स फंड व इक्विटी फंड असे तीन पर्याय असतात.